कौतुकास्पद ! लग्नासाठी जमा केलेल्या 2 लाखाची लॉकडाऊनमध्ये केली गरजूंना मदत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – रिक्षा चालकाने लग्नासाठी साठवलेले 2 लाख रुपये कोरोनाच्या महासंकटात गरजूंच्या मदतीसाठी वापरले आहेत. हे पैसे त्याने लग्न चांगल्या पद्धतीने कऱण्यासाठी साठवले होते. मात्र कोरोनाचे संकट आल्यामुळे लॉकडाऊन सुरू झाले. या लॉकडाऊनमुळे त्याचे लग्न होऊ शकले नाही. मात्रा, संबंधित तरुणाने 2 लाख रुपये अनोख्या पद्धतीने मदत करत गरजूंना वापरले आहेत. अक्षय कोठावळे असे तरुणाचे नाव आहे.

कोरोनाच्या महासंकटात अक्षयने अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. लग्नासाठी साठवलेले पैशातून अक्षय गरीब, मजूर आणि वृद्ध-गर्भवती महिलांची मदत करत आहे. याशिवाय वृद्ध रूग्ण आणि गर्भवती महिलांना विनाशुल्क रिक्षातून रुग्णालयात पोहोचवण्याचे काम करत आहे. 25 मे रोजी अक्षयच्या लग्नाची तारीख ठरली होती त्यासाठी पैसेही साठवले पण लॉकडाऊन वाढल्याने विवाह तात्पुरता पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

”मी लोकांना रस्त्यावर हालाकीचे जीवन काढताना पाहिले आहे. त्यांना नीट अन्नही मिळत नव्हते. कोणत्याही परिस्थितीत जगण्यासाठी त्यांची केवीलवाणी धडपड मला दिसत होती. हे पाहून मी मनातून हादरून गेलो आणि काही मित्राच्या सोबतीने लोकांची मदत कऱण्याचा निर्णय घेतला.”असल्याचे त्याने सांगितले. अक्षयने मित्रांची मदत घेऊन भुकेलेल्यांना पोळी-भाजी वाटण्याचे काम सुरू केले. याशिवाय मजूर आणि गरजूंना खायला देण्याची मदत केली आणि वृद्ध आणि गर्भवतींना आपल्या रिक्षातून रुग्णालयात पोहोचवले. त्याच्या कामाचे सोशल मीडियावर तुफान कौतुक केले जात आहे.