Coronavirus : ‘वुहान’कडे दुपारी जाणार दुसरे विमान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील ‘वुहान’ शहरात ‘कोरोना’ या संसर्गजन्य रोगाचा कहर झालेला आहे. तिथे असलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतातून दुसरे विमान आज दुपारी एक वाजता प्रयाण करणार आहे. एअर इंडियाचे ऑपरेशन संचालक अमिताभ सिंह यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर्स आणि परिचारिकांचे दुसरे पथक रवाना होत आहे.

या पथकासोबत संसर्ग रोखण्यासाठीचे मास्क, ओव्हकोट, खाद्यान्नाची पाकिटे, पिण्याचे पाणी हे सर्व सोबत देण्यात येणार आहे. या टीममध्ये अभियंते आणि सुरक्षा कर्मचारीही असतील. ‘वुहान’मधे मध्यरात्री एअर इंडियाचे एक विमान आधी गेले. त्यातून ३२४ भारतीय प्रवाशांना परत आणण्यात येत आहे. तिथे नेमके किती भारतीय अडकले आहेत त्याचा अंदाज नसल्यामुळे दुसरे विमान दुपारी रवाना करण्यात येणार आहे. विमानतळावरच परतणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून पुढील काही दिवसांसाठी स्वतंत्र कक्षात त्यांना ठेवण्यात येणार आहे. भारतीयांना ‘वुहान’मधून परत आणण्याची जोखीम एअर इंडिया व्यवस्थापनाने स्वीकारली आहे.