Coronavirus : महाराष्ट्रात ‘कोरोना’बाधितांसाठी 30 विशेष रूग्णालये, वाचा संपूर्ण यादी

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  –   देशात कोरोना संक्रमितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता या विषाणूला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून राज्यातील ३० शासकीय रुग्णालयांना घोषित केले आहे. या रुग्णालयांत केवळ कोरोना संक्रमितांवरच उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून कोरोना बाधितांच्या उपचारासाठी २ हजार ३०५ खाटा उपलब्ध करून दिल्या असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान, या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना कोरोना संशयित आणि संक्रमित रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे अनिवार्य असणार आहे.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले कि, केंद्राबरोबरच राज्य शासनामार्फतही कोरोना प्रतिबंधासाठी अनेक महत्वाची पावले उचलत असून प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करत आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढविण्याबरोबर गरज पडल्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांचा वाढत आकडा लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे.

जिल्हा आणि त्यातील अधिसूचीत रुग्णालये आणि खाटांची संख्या –

कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर दवाखाना (१००), वाशी- सामान्य रुग्णालय (१२०), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (१००), ठाणे- जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (१००), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (१००), सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (७५), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय (१००) आणि कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय (५०), नाशिक- कुंभमेळा बिल्डींग (१००) आणि महानगरपालिका कठडा हॉस्पीटल (७०), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (५०), धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (५०), अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (१००), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (५०), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (१००), सातारा- सामान्य रुग्णालय (६०), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (५०), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (१००), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (१००), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (५०), तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (५०), अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (१००), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (५०), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (५०), मुखेड उपजिल्हा रुग्णालय (५०), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (१००), वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (५०), वर्धा- सामान्य रुग्णालय (५०), गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (१००) आणि भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (८०) यासर्व जिल्हा रुग्णालयांची कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी घोषणा केली असून येतील सर्व खाटा मिळून २३०५ खाटा उपलब्ध होणार आहेत.