Coronavirus : 2 मीटरपर्यंतच पसरतो ‘कोरोना’, निरोगी व्यक्तीला मास्कची गरज नाही – AIIMS

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसशी संबंधी अनेक शंकांचे निरसण देशातील सर्वात मोठ्या हॉस्पिटलने केले आहे. दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले की, निरोगी व्यक्तींना मास्क घालण्याची अजिबात गरज नाही. कोरोना व्हायरस ह्यूमन व्हायरस आहे. याचा जनावरांशी काहीही संबंध नाही. नॉनव्हेज खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत नाही.

तुम्हाला मास्कची गरज आहे का ?
एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसच्या भितीखाली जगण्याची गरज नाही. एका निरोगी व्यक्तीला मास्क घालण्याची अजिबात गरज नाही. जर कुणाला ताप-खोकला आहे आणि त्याला वाटत असेल की त्याचे इन्फेक्शन अन्य कुणालाही होऊ नये तर ती व्यक्ती मास्क घालू शकते. एन-95 मास्क सुद्धा केवळ त्याच लोकांनी घालावेत जे रूग्णांच्या संपर्कात आहेत, म्हणजे कोरोना व्हायरसने पीडित रूग्णांची सेवा करत आहेत. हेल्थ केयर वर्कर्सला मास्क घालणे गरजेचे आहे.

2 मीटरपर्यंतच जाऊ शकतो व्हायरस
डॉ. गुलेरिया म्हणाले, जर जवळपासच्या एखाद्या व्यक्तीला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला असेल, तर सर्व लोकांना घाबरण्याचे कारण नाही, कारण कोरोना व्हायरस एक ड्रॉपलेट इन्फेक्शन आहे जे 2 मीटरपर्यंतच जाऊ शकते. जर कोरोना पीडित रूग्ण खोकत असेल तर त्याचा व्हायरस 2 मीटरपर्यंत हवेत राहू शकतो. त्याचवेळी एखाद्या व्यक्तीने त्या 2 मीटरमधील हवा श्वासाद्वारे आत घेतली तर त्यास इन्फेक्शन होऊ शकते. हा व्हायरस कोणत्याही वस्तूच्या पृष्ठभागावर राहू शकतो, त्यामुळे सतत हात धुतले पाहिजेत.

अल्कोहलचा कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नाही
एम्सच्या संचालकांनी सांगितले की, हे म्हणणे चुकीचे आहे की, दारू प्यायल्याने कोरोना व्हायरसचा आजार बरा होतो. अल्कोहल आणि कोरोना व्हायरसचा काहीही संबंध नाही.

नॉनव्हेज खाल्ल्याने कोरोना होत नाही
नॉनव्हेजशी संबंधित शंका दूर करताना डॉ. गुलेरिया म्हणाले, कोरोना व्हायरस एक ह्यूमन व्हायरस आहे. याचा जनावरांशी काहीही संबंध नाही. हा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला होऊ शकतो. यामुळे नॉनव्हेज खाण्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता नाही.

तापमानाशी नाही संबंध
डॉ गुलेरिया यांनी हेदेखील सांगितले की, हा व्हायरस सिंगापुरसारख्या उष्ण देशात सुद्धा पसरत आहे. तसेच इटली आणि साऊथ कोरियासारख्या थंड देशातही पसरत आहे. थंडीत हा व्हायरस जास्त वेळ राहू शकतो, परंतु आपण व्हायरसला रोखण्यासाठी सर्व उपाय केल्यास आपण सुरक्षित राहू शकतो. कोरोना व्हायरसवर अजून कोणतीही लस किंवा औषध आलेले नाही.

डॉ. गुलेरिया म्हणाले, सोशल मीडियामुळे या आजाराबाबत जास्त भिती पसरत आहे. कोरोना व्हायरसमुळे होणार्‍या मृत्यूदर 2 ते 3% आहे, म्हणजे 98% लोक बरे होतात.