Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या ‘महामारी’मुळं राज्यातील सर्वात मोठी यात्रा रद्द

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादमधील प्रशासनाकडून कोरोनो व्हायरसची साथ पसरू नये म्हणून पैठणमध्ये होणारी नाथषष्ठी यात्रा स्थगित करण्याचे आदेश मंगळवारी दुपारी देण्यात आले. त्यानंतर सर्वात मोठी समजली जाणारी उस्मानाबाद येथील येडेश्वरी देवीची यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.

येरमाळा (ता.कळंब) येथील देवी येडेश्वरी जी तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणून परिचित आहे. तिची यात्रा चैत्र पौर्णिमा ८ एप्रिल पासून सुरु होणार आहे. दरवर्षी होणाऱ्या येडेश्वरीच्या यात्रेचा कालावधी पाच दिवसांचा असतो. यात्रेनिमित्त चैत्र पौर्णिमेदिवशी देवीची डोंगरावरील मंदिरात महापूजा करून रात्री छबीना मिरवणूक निघत असते. मात्र कोरोनाच्या भीतीने यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला.

बुधवारी उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी मंदिर ट्रस्ट आणि गावकऱ्यांची या संबंधी बैठक घेतली. यात्रेला १० लाखांच्या वर भाविक येतात त्यादरम्यान कोरोनाचा विषाणू पसरण्याची शक्यता असल्याने एक मतांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय गावकरी मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आला असून, मंदिर येथून निगणारा पालखी सोहळा व चुनखडी वेचण्याचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आला आहे.