धक्कादायक ! आपल्याला ‘कोरोना’ झाला हे तब्बल ‘इतक्या’ % मुंबईकरांना माहितच नाही

मुंबई : पोलीनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचीसंख्या 3 लाखाच्या वर गेली आहे. तर मुंबईची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण वाढीचा दर घटला आहे अशी बातमी समोर येत आहे. तर दुसरीकडे बहुतेक मुंबईकरांना कोरोना होऊन गेला मात्र त्यांना याची माहितीही नाही, यामुळे चिंता वाढली आहे. एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या अँटीबॉडी चाचणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका खासगी प्रयोगशाळेने अँटिबॉडी टेस्ट केली. त्यामध्ये लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज तयार झाल्याचे दिसून आले. याचा अर्थ लोकांना कोरोनाची लागण झाली होती. भाजप नेते आशिष शेलार यांनी याबाबत ट्विट केलं आहे. त्यांनी सांगितले, थायरोकेअर लॅबने केलेल्या अँटिबॉडी चाचण्यांमध्ये वरळीत 32.15 टक्के, घाटकोप 36.7 टक्के, सांताक्रुज 31.45 टक्के तर वांद्रे पश्चिमेला 17 टक्के जणांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आशिष शेलार यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना पत्र लिहिलं आहे आणि एक लाख अँटिबॉडी चाचण्या करून त्याचा अहवाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.

शेलार यांनी लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबईतील कोरोना संक्रमणाची सध्यस्थिती अचूकपणे समजण्यासाठी किमान एक लाख लोकांची चाचणी करण्यासाठी पालिकेने तातडीने पावले उचलावीत. महापालिकेने सर्व सार्वजनिक आणि खासगी प्रयोगशाळांमधून उपलब्ध अँटीबॉडी डेटा संकलित करावा. त्यानंतर त्याचे विश्लेषण केलं पाहिजे. हा सर्व डेटा सह उपलब्ध आहे आणि येत्या सात दिवसांच्या कालावधीत निष्कर्षासह डेटाचा निकाल मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावा, अशा मागणी शेलार यांनी केली आहे.