Coronavirus : दिलासादायक ! मुंबईतील रुग्ण पॉझिटीव्हिटीचा दर 10 टक्क्यांच्या खाली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना चाचण्यांचं (Covid-19 Test) शहर आणि उपनगरातील प्रमाण सुरळीत आहे. याशिवाय रुग्णनिदानाचा दर देखील घसरताना दिसत आहे. दिलासादायक बाब अशी की, मुंबईत पहिल्यांदाच रुग्ण पॉझिटीव्हिटीचा (Corona Positivity Rate) दर हा 10 टक्क्यांच्या खाली आला आहे.

कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आल्याच्या परिणामासाठी जागितक आरोग्य संघटनेनं पॉझिटीव्हिटी दर 5 टक्क्यांच्या खाली तर इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनं (Indian Council of Medical Research) पॉझिटीव्हिटी दर 10 टक्क्यांच्या खाली असावा असं नमूद केलं आहे.

जून महिन्यापर्यंत दर दिवसाला 100 चाचण्यांचं प्रमाण होतं, त्या वेळेस पॉझिटीव्हिटी दर 20 टक्के दिसून आला होता. गेल्या 10 दिवसात 1 लाख 31 हजार 301 चाचण्यांनंतर 13 हजार 539 रुग्णांचं निदान झालं आहे. यापूर्वी संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात हे प्रमाण 1 लाख 95 हजार 668 चाचण्यांमागे 31 हजार 53 एवढे होते. मुंबईत ऑक्टोबर महिन्यात दिवसाला 13-15 हजार चाचण्या केल्या जात आहेत. 1 लाख 31 हजार चाचण्यांमध्ये 58 हजार 600 अँटीजन चाचण्यांचा समावेश होता. त्या चाचण्यांच्या माध्यमातून रुग्ण निदानाचं प्रमाण केवळ 5 टक्के आहे. ऑक्टोबरच्या पंधरवाड्यात अँटीजन चाचण्यांचं प्रमाण हे 40 टक्के राहिलं आहे. तर दुसरीकडे आरटीपीसीआर चाचण्यांचं प्रमाण 25 टक्क्यांनी कमी झालं आहे. मागील 10 दिवसात हे प्रमाण 20 टक्क्यांच्या खाली गेलं आहे.