Coronavirus Lockdown : माझ्या वडिलांना वाचवा ! मुलीची पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांना ‘विनवणी’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – जगभरात कोरोना संसर्गाचा प्रसार वेगाने वाढत आहे. मात्र, सर्वतोपरी प्रयत्न करून देखील आव्हाने वाढताना दिसत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे हा आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला त्याची जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन लागू केला. मात्र कोरोना संसर्गामुळे अनेक कुटुंबियांवर बिकट परिस्थिती ओढावल्याचे आपण पाहिले असेल. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली आहे.

दिल्लीमधील एका मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे वडिलांना वाचवा असं सांगत मदत मागितली आहे. या मुलीच्या वडिलांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून, वडिलांना वाचवा असं म्हणतं सरकारी रुग्णालयातील भीषण वास्तव सांगणारा मुलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना या व्हिडिओतून मुलीने आणि तिच्या आईने विनवणी केल्याचं दिसत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिभा गुप्ता असं या मुलीचं नाव असून ती दिल्लीच्या जहांगीरपुरा येथील सेक्टर जी मध्ये राहते.

त्या व्हिडीओ मध्ये तिने म्हटलं की, ‘माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांना शंका आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर रुग्णालयाने कोणत्याही प्रकारची कल्पना न देता वडिलांना सरकारी रुग्णालयात हलवलं. १८ तारखेला किमान दोन-तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर त्यांना रात्री ८ वाजता दाखल केलं गेलं. दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी १२ वाजेपर्यंत त्यांना नाश्ता, जेवण काहीही दिल गेलं नाही. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार असल्याने, त्यांना वेळेवर अन्न-पाणी दिल नाही तर त्यांना अधिक धोक निर्माण होऊ शकतो. त्यांना १०२ ताप आहे. मात्र स्टाफ, नर्सकडे त्यांनी मदत मागितली असता कोणीच मदत करत नाही’ असं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हात जोडून विनंती करत आहोत. कृपया आम्हाला मदत करा. जे बातम्यांमध्ये दाखवलं जात आहे त्यात आणि वास्तवात प्रचंड तफावत दिसून येत आहे. आम्ही त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करू शकतो. पण सरकारी आदेशानुसार आम्हाला तेही करू दिले जात नाही. आम्ही घरात बसून आहोत. चिंता आणि काळजी करण्याशिवाय काहीच करू शकत नाही. मोदीजी, केजरीवालजी आम्ही हात जोडतो. माझ्या वडिलांचे प्राण व वाचवा’ अशी विनवणी या मुलीने केली आहे. त्या सोबतच या व्हिडिओमध्ये तिच्या आईने देखील आपल्या पतीला वाचवण्याची विनंती केली आहे.