संतापजनक ! मद्यधुंद तरूणाचा पत्नीसह 3 मुलांवर अ‍ॅसिड हल्ला

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भांडणाला वैतागून मद्यधुंत तरुणाने पत्नीसह मुलांवर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पत्नीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक गोळा झाले होते. त्यांनी तातडीने पोलिसांनी घटनेची माहिती दिली. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नी आणि तीन मुलांना एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शाहिदने नशेत धुंद असताना भांडणाला वैतागून हे पाऊल उचलले आहे. तरुणाला अ‍ॅसिडच्या बाटलीसह पकडण्यात आले असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असून तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

या अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन मुलांची प्रकृती स्थिर आहे. तर चार वर्षांच्या चिमुकल्याची आणि पत्नीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद रुग्णालयातून एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.