Coronavirus : राज्यभरात बंदी आदेश लागू, सरकारकडून एकदम कडक उपाययोजना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन  – जगभरात हाहाकार माजवणाऱ्या करोनाचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील सिनेमागृहे, म्युझियम व नाट्यगृहे बंद ठेवण्याचा आदेश दिल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली. मुंबई पोलिसांनी आंतराष्ट्रीय, देशांतर्गत सहली आणि व्यवसाय दौऱ्यांवर निर्बंध घातले आहे. खासगी सहल कंपन्या किंवा व्यक्तींना असे दौरे ३१ मार्च पर्यंत करता येणार नाहीत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेतील कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

औरंगाबाद येथील कझाकिस्तानातून आलेल्या ५९ वर्षीय महिलेला करोनोची लागण झाली आहे. राज्यात करोनोग्रस्तांची संख्या ३३ वर पोहचली असून ९ रुग्णांवर कस्तुरबा येथील विलगीकरण कक्षात उपचार सुरु आहे. तसेच ८० संशयित रुग्ण देखील आहे. कायदा सुव्यवस्थेचा विचार करून अतिरिक्त कुमक तैनात करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले.

तसेच राज्यातील सिनेमागृहे, नाट्यगृहे, म्युझियम बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी शाळा, महाविद्यालये, व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि मर्यादित सिनेमागृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. गुढीपाडव्या दिवशी शिर्डीला हजारो लोक पायी पोहचतात त्यामुळे यंद्याच्या वर्षी प्रथेला बाजू ठेवावे याबाबत शिर्डी संस्थानाने भक्तांना आवाहन करण्यात यावे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई, पुणे, नागपूर आंतराष्ट्रीय विमानतळावर १५८४ विमानांतून आलेल्या १,८१,९२५ जणांची तपासणी केली आहे. ७५८ लक्षण आढळलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले असून ६६९ लोकांचे नमुने नकारात्मक आले आहे. असे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबई मध्ये नवीन रुग्ण नाही

रविवारी राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३३ वर गेली असून मुंबईसह महानगर परिसरात लोकांसाठी दिलासा देण्याची बाब म्हणजे रविवारी येथे एकाही नव्या संशयित रुग्णाची नोंद झालेली नाही. रविवारी कस्तुरबा रुग्णालयात ४३ जणांची करोना चाचणी झाली मात्र त्यांचे अहवाल नकारात्मक आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

पुण्यात निर्बंध

पुणे परिसरात कोरोनो बाधित १६ रुग्ण आढळल्याने प्रशासनाच्या वतीने अनेक निर्बंध लागू केले आहे. नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे, ओपन पार्क बंद करण्यात आले असून फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने तेवढी सुरु राहतील, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली.

देवालये ओस, रुग्णालय फुल्ल !

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (पंढरपूर), सिद्धिविनायक (मुंबई), महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर), ज्योतिबा देवस्थान (वाडी रत्नागिरी), अंबाबाई देवस्थान (तुळजापूर) येथील गर्दी ओरसली असून, करोनोच्या संसर्गाच्या भीतीने साधी सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांनी दवाखान्यात धाव घेतली असल्याने रुग्णालयात गर्दी होती.

बाप्पालाही मास्क !

नाशिकमध्ये करोनोचा संसर्ग बाप्पाला होऊ नये म्हणून विघ्नहर्त्या गणरायाच्या मुखाला मास्क लावण्यात आला आहे. यामागे भाविकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनावर भर द्यावा, असा संदेश देण्याचा मंदिर समिती व्यवस्थापनाचा उद्देश आहे.

बुलढाण्यात त्या वृद्धाचा मृत्यू ‘करोनो’ मुळे नाही

करोनोचा संसर्ग असल्याच्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचारादरम्यान दगावलेल्या ७१ वर्षीय वृद्धाचा मृत्यू करोनामुळे झाला नसल्याचे प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले. नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालतील विषाणू तपासणी प्रयोगशाळेतून त्यांचा ‘कोरोना नकारात्मक’ असल्याचा अहवाल जिल्हा शल्य चिकित्साकडे रविवारी दुपारी प्राप्त झाला.

देशातील रुग्ण संख्या १०८, २ जणांचा मृत्यू

देशभरात कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. महाराष्ट्रात नवे १२ रुग्ण सापडले आहे. दिल्ली आणि कर्नाटकात २ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये ७, उत्तर प्रदेश ११, कर्नाटक ६, महाराष्ट्र ३३, लडाख ३, जम्मू काश्मीर २, तेलंगणा ३, राजस्थान २, व तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पंजाब मध्ये प्रत्येकी एक रुग्ण आहे. केरळ मध्ये २२ रुग्ण असून ३ जणांना डिस्चार्ज दिला आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ४००० लोकांवर विशेष नजर ठेवली जात आहे. तर ८० लाखांहून अधिक एन ९५ मास्कची ऑर्डर देण्यात आलीय.

केरळ मध्ये आलेल्या एका ब्रिटिश नागरिकाला संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोची विमानतळावर दुबईला जाणाऱ्या २० प्रवाशांना उड्डाणापूर्वी रविवारी ताब्यात घेण्यात आले असून केरळमधील रुग्णांची संख्या आता २२ वर पोहचली आहे. ब्रिटनचे २० प्रवाशी मुन्नार शहरात सुट्टीनिमित्त आले होते. हा संक्रमित रुग्ण याच समूहातील आहे.

सुमारे ६००० जणांचा जगभरात मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेकडून जगभरातील कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू यांची आकडेवारी प्रत्येक सेकंदाला अपडेट करणे सुरु आहे. त्यानुसार १५३,६४८ पेक्षा अधिक कोरोनोबाधित रुग्ण असून ७३, ९६८ रुग्ण बरे झाले आहे.  तर मृत्यूचा आकडा हा ६००० पार झाला आहे.