Coronavirus : जगभरात कोरोनाचा ‘हाहाकार’ ! 3 अब्ज नागरिक लॉकडाऊन तर 21 हजार जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन –  चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कावेत घेतले आहे. या महारोगाने भयानक रुप धारण केले असून जीवावर बेतणाऱ्या या कोरोनाचा जगभरातील 198 देशांमध्ये फैलाव झाला आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील 50 पेक्षा अधिक देशांनी लॉकडाऊन घोषीत केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून मृतांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत जगभरात 21 हजार पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जगभरातील 3 अब्ज लोक घरांमध्ये बसून आहेत. कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या ही खूप मोठी असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे जाणकारांचे सांगतात. मागील 24 तासामध्ये स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये 738, इटली 683 आणि फान्समध्ये 231 जणांचा मृत्यू झाला आहे.

स्पेनमध्ये चीनपेक्षा अधिक मृत्यू
कोरोना व्हायरसने इटलीमध्ये थैमान घातल्यानंतर कोरोनाच्या संसर्गाने स्पेनमध्ये थैमान घातले आहे. स्पेनमध्ये चीनपेक्षाही अधिक मृत्यू झाले आहेत. स्पेनमध्ये आतापर्यंत 3 हजार 647 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनमध्ये 3 हजार 287 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास अपयश आले आहे. इटलीमध्ये 7 हजार 503 जणांचा मृत्यू झाला आहे तर 74 हजारपेक्षा अधिक जणांना संसर्ग झाला आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये मृतांची संख्या अधिक आहे.

अफ्रिकेत देखील फैलाव
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग आफ्रिका खंडातही फैलावत असल्याचे चित्र आहे. नायजर, कॅमेरून, इस्टोनिया आदी देशांमध्ये कोरोनामुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली आहे. साधनसामग्रीचा तुटवडा, खाटांची कमतरता, तुटपुंज्या वेतनावर काम करणारे डॉक्टर आणि परिचारिका यामुळे आफ्रिका खंडातील परिस्थिती अत्यांत वाईट आहे. कोरोनाशी लढा देताना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. आफ्रिका खंडात 1800 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 50 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

आफ्रिकेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
कोरोनाचा फैलाव युरोप, पश्चिम आशिया, आशिया यांच्या तुलनेत आफ्रिकेत कमी आहे. असे असले तरी येत्या काळात तो वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सोमालिया सारख्या देशात 10 हजार नागरिकांमध्ये एक डॉक्टर आहे. अशा स्थितीत या ठिकाणी कोरोनाचा फैलाव झाल्यास काय होईल याची कल्पना देखील करणे योग्य नाही. केनियात पाच कोटी लोकसंख्या आहे. संपूर्ण देशात मिळून फक्त 100 अतिदक्षता विभाग आहेत.

इतर देशाची स्थिती चिंताजनक
मृतांचा आकडेवारीत इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. स्पेनमध्ये 49 हजार 515 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. इराणमध्ये कोरोनामुळे 2 हजार 77 जणांचा मृत्यू झाला असून 27 हजार 107 जणांना संसर्ग झाला आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 25 हजार 233 जणांना संसर्ग झाला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 465 जणांचा मृत्यू झाला असून 9 हजार 529 जणांना संसर्ग झाला आहे. दक्षिण कोरियात 9 हजार 241 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे तर 131 जणांचा मृत्यू झाला आहे.