Coronavirus : Mask न न वापरणार्‍यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा,उच्च न्यायालयाचे सक्त आदेश

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   देशभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. रुग्ण सातत्याने वाढत असले तरी कोरोबाबत अनेकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. अनेकजण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने कठोर भूमिका घेत शनिवारी (दि. 28) सक्त आदेश दिले आहेत. जे लोक मास्क न लावता फिरतात त्यांच्याकडून दंड वसूल करा. तसेच दंडात्मक कारवाई करूनही लोक सुधारत नसतील तर त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवा, असे कठोर आदेशच गुजरात न्यायालयाने सरकारला दिले आहेत.

गुजरात हायकोर्टात मास्कबाबत एक याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने गुजरात सरकारला राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती विचारली. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, अशी विचारणाही कोर्टाने केली. त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने सांगितले की, राज्यात राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. विवाहामध्ये केवळ 100 आणि अंत्यसंस्कारासाठी केवळ 50 जणांना उपस्थित राहण्याची सूचना केली आहे.

जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे. मात्र या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. अनेकजण मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाचा वाढीचा संसर्ग विचारात घेऊन गुजरात हायकोर्टाने ही कठोर पावले उचलली आहेत.