Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्त्वाचे 3 निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. वर्षा बंगल्यावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला कॅबिनेट मंत्री आपआपल्या जिल्ह्यातून उपस्थित होते. लोकांची लॉकडाऊनच्या काळात गैरसोय होऊ नये यासाठी सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

1. तालुकास्तरावर पुढील 3 महिने 5 रुपये दराने शिवभोजन थाळी

शिवभोजन योजनेचा तालुकास्तरावार विस्तार करून पुढील तीन महिने 5 रुपये दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक मजुर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी आणि इतर लोकांना जेवणाची सोय व्हावी आणि त्यांचे हाल होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

शिवभोजन केंद्र चालवणाऱ्यांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारांवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

2. कोरोना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे होत असलेला संसर्ग अटोक्यात आणण्यासाठी राज्यात तातडीने विविध उपाययोजना, अधिसुचना व आदेश काढण्यात आले या उपाययोजनांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

– 13 मार्च 2020 च्या अधिसुचनेनुसार राज्यात साथरोग कायदा 1897 लागू केला.
– उपाययोजनांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 13 मार्च रोजीच उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली.
– 14 मार्च 2020 रोजी महाराष्ट्रात कोरोना उपाययोजना नियम 2020 अधिसूचना लागू झाली. त्याअंतर्गत अलगीकरण आणि विलगीकरण याबाबतचे नियम ठरवण्यात आले. तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाई, खासगी रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करणे याबाबी या नियमावलीमध्ये आहेत.
– गर्दीमुळे होणारा ससर्ग टाळण्यासाठी उपययोजना करण्यात आल्या
– आपत्कालीन परिस्थितीत औषधे व यंत्रसामग्री व उपकरणे खरेदी करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान त्याच प्रमाणे संचालक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये यांच्या स्तरावर समिती गठीत करून त्यांना काही अटी व शर्तीनुसार खरेदी करण्यास मुभा देण्यात आली.

3. केशरी शिधापत्रिका धारकांना सवलतीत धान्य
केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ प्रती व्यक्ती देण्याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यांना 8 रुपये प्रती किलोने गहू आणि 12 रुपये प्रती किलो दराने तांदूळ अशा दरात धान्य मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच पत्र लिहून संबंधित मंत्रालयाला आवश्यक ते निर्देश देण्याची विनंती केली आहे.