‘कोरोना’च्या संकटात सरकारला कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार, पण…

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोनामध्ये सरकारला कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत. ही राजकारण करण्याची वेळ नाही, असे उद्धव ठाकरे सांगतात. आमच्याकडून त्याचे पालन होत आहे. पण सत्ताधार्यांनी सुद्धा याचे पालन केले पाहिजे. वारंवार आणि विनाकारण केंद्र सरकारकडे बोट दाखविणे योग्य नाही असे मत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते सहभागी झाले होते.

कोरोनामुळे राज्यातील आरोग्यस्थिती वाईट झाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सायन रुग्णालयात तर मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णांना आता बेड्स मिळणे कठीण झाले आहे. करोना नसलेल्या रुग्णांचे सुद्धा मोठे हाल होत आहेत. आरोग्य सेवेतील अनेक डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने यात तत्काळ लक्ष घालावे. कोरोना रुग्ण तसेच मृतांची संख्या दडविण्याचे प्रकार अतिशय गंभीर आहेत, यात सुद्धा सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात पोलिसांवर होत असलेले हल्ले, त्यांचे खचलेले मनोबल, त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष आणि कोलमडलेली आरोग्य यंत्रणा याकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

शेतमाल खरेदी, खरीप हंगामासाठी मदत आणि स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांकडे सुद्धा गांभीर्याने लक्ष द्या, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. केंद्र सरकार रेल्वेसेवा देण्यास तयार असून मजूरांना पायी जाण्यापासून रोखून तत्काळ रेल्वेने प्रवास करता येईल, हे सुनिश्चित करावे. रेशन दुकानातून धान्य मिळत नसल्याबद्दलच्या तक्रारी कायम आहेत. जे धान्य दिले जातेय ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. रेशनकार्ड नसलेल्यांना पण इतर छोटी राज्ये धान्य देत आहेत. महाराष्ट्राने सुद्धा ते करावे. मालेगाव येथे मागच्यावर्षीच्या तुलनेत मृतांची वाढलेली संख्या पाहता तेथे मोठ्या प्रमाणात चाचण्या वाढविण्यात याव्यात व त्याप्रमाणात उपचारांची व्यवस्था उभी करण्यात यावी. शेतमाल खरेदी थांबलेली आहे, कारण खरेदीसाठी पुरेशा यंत्रणा उभारण्यात आलेल्या नाहीत. पुढचा हंगाम तोंडावर असताना तूर, कापूस, हरभरा शेतकर्यांच्या घरात पडून आहे. त्यामुळे शेतमाल तत्काळ खरेदी करावा आणि आगामी खरीप हंगामासाठी शेतकर्यांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.