गणेशोत्सव साजरा करण्यासंबंधी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. परंतु सध्या राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न अनेकांना पडला आहे. सर्व गणेशभक्तांचं सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहीले आहे. दरम्यान यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून यासंबंधी सूचना देण्यात आल्या असून मंडळांनी निर्णय मान्य करणार असल्याचे सांगितले आहे. सार्वजनिक गणेश मंडळ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक झाली. उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोनाचे संकट असल्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यासंबंधी सूचना दिल्या. गणेश मंडळांनीही यासाठी तयारी दर्शवली असून राज्य सरकार देईल तो आदेश आपण मान्य करणार असल्याचे गणेश मंडळांनी दिले. तसेच कोणताही अडथळा आणला जाणार नाही असे आश्वासन देखील देण्यात आले.

मिरवणुकांना परवानगी नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

मुर्तीकारांची अडचण
प्रत्येक वर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून 10 फूट, 12 फूट व इतर मोठमोठ्या गणेश मूर्ती घडविण्याचं काम हे कलाकार करत असतात. रंगरंगोटी, हिरे सजावट व इतर सजावटीची कामे केली जातात. यातून या कलाकारांना चांगली कमाई होत असते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे बहुतांश मंडळांनी मोठ्या मूर्ती न ठेवता लहानच मूर्तींची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतल्याने कलाकारांना याचा मोठा फटका बसला आहे. तसेच मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर मिळत नसल्याने याचा परिणाम मूर्ती घडवणाऱ्यांवर देखील झाला आहे.