‘तुम्हाला लाज वाटायला पाहिजे’, मीडियावर संतापली MS धोनीची पत्नी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनासाठी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने एक लाख रुपये दिले असल्याचे वृत्त पसरले होते. त्यावर महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी देशातील मीडियावर चांगलीच संतापली आहे. माझी सर्व माध्यमांना विनंती आहे की, कृपया अशा संवेदनशील वेळी तरी खोट्या बातम्या देणे थांबवा तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. जबाबदार पत्रकारिता कुठे गायब झाली आहे काय कळत नाही. अशा आशयाचे ट्विट करत साक्षीने माध्यमांविरोधात संताप व्यक्त केला आहे.

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईमध्ये मदत म्हणून धोनीने पुण्यातील 100 कुटुंबांसाठी एक लाख रुपये दान केल्याचे वृत्त काल सोशल मीडियावर पसरले होते. काही माध्यमांनीही याबाबतचे वृत्त संकेतस्थळांवर दिले होते. त्यानंतर सोशल मीडियामध्ये धोनीविरोधात नेटकर्‍यांनी राग व्यक्त केला होता. वर्षाला 800 कोटी रुपये कमावणारा धोनी मदत म्हणून केवळ एक लाख रुपये देतो असे म्हणत धोनीला जोरदार ट्रोल केले. पुण्यातील मुकुल माधव फाउंडेशन नावाच्या एका एनजीओने करोना व्हायरसमुळे संकटांचा सामना करावा लागणार्‍या 100 कुटुंबांच्या मदतीसाठी 12.5 लाख रुपये जमवण्याचे ठरवले होते.

त्यात एक लाख रुपये कमी पडत होते, त्यामुळे क्राउडफंडिंग वेबसाइट केटोच्या माध्यमातून धोनीने एक लाख रुपये देऊन केवळ ती रक्कम पूर्ण केली. मात्र, धोनीने अद्याप स्वतःकडून मदत जाहीर केलेली नाही.