Coronavirus Impact : मुंबईची लाईफलाईन ‘अनावश्यक’ प्रवासासाठी सामान्यांना 31 मार्चपर्यंत बंद

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात कोरोनाच्या हैदोसामुळे विविध निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करता येणार नाही. आज सकाळी 6 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत अनावश्यक लोकल प्रवाशांवर निर्बंध लागू केले आहेत. कोकण विभागीय आयुक्तांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनावश्यक लोकल प्रवाशांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. आयकार्ड पाहून लोकल स्थानकांवर प्रवेशासाठी देणार परवानगी, अन्यथा प्रवास करण्यास बंदी.  प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर तपासणी पथक नियुक्त करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला म्हणजे रविवारी ‘जनता कर्फ्यु’ची घोषणा केली आहे.

नागरिकांनी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत घराबाहेर निघू नये, असे आवाहन केले आहे. त्यामुळे आज मुंबईसह, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूरसह राज्यभरात नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने बंद पाळला आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणार्‍या पॅसेंजर्ससह एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 22 मार्च रोजी तब्बल 55 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेस, राज्यराणी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस यासह अनेक गाड्यांचा समावेश आहे.