Coronavirus : राज्यातील कोरोना रूग्णांच्या मृत्यूंमध्ये 40 टक्क्यांची घट !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रसार हळूहळू कमी होत आहे. तसेच कोरोनाच्या मृत्युसंख्येत देखील घट झाली आहे. मागील पाच महिन्यांत पहिल्यांदाच राज्यात दोन अंकी मृत्युसंख्येची नोंद करण्यात आली. हे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले आहे.

शनिवारी राज्यात ७४ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला. हे प्रमाण मागील १५९ दिवसांतील सर्वांत कमी आहे. याआधी राज्यात २५ मे रोजी दिवसभरात ६० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. तद्वतच, गेल्या १४ दिवसांत दररोज होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील २०० पेक्षा कमी झाली आहे. तथापि, राज्यात दररोज करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांची संख्या जवळपास ७० हजार असूनही पॉझिटिव्हिटी रेटचा आलेख कमी झाला आहे.

येणाऱ्या दोन आठवड्यांमध्ये रुग्णसंख्येचे प्रमाण अजून कमी होईल, अशी अपेक्षा राज्याचे आरोग्य विभागाचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी व्यक्त केली. चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आले नसून, ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मुंबई, ठाणे, सोलापूर, आणि कोल्हापुरातील रुग्णसंख्या कमी झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरु केले असून, त्याने संशयित रुग्णांची तात्काळ तपासणी, निदान आणि उपचार वेळेवर होत असल्याने संसर्गाची साखळी तोडण्यास मदत होत आहे.

मुंबईत २ लाख २९ हजार बरे झाले

रविवारी मुंबईत कोरोनाच्या ९०८ रुग्णांची नोंद करण्यात आली असून २५ मृत्यू झाले आहे. मुंबईत शहर आणि उपनगरातील एकूण रुग्णांची संख्या २ लाख ५८ हजार ४०५ झाली असून, आजवर एकूण १० हजार ३१८ मृत्यू नोंदवण्यात आले. आता १८ हजार ५२२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर रविवारी दिवसात १ हजार ७१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, आजवर २ लाख २९ हजार २५ रुग्णांना उपचारनंतर सोडून देण्यात आले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९% झाले असून रुग्ण दुपटीचा कालावधी आता १७१ दिवसांवर गेला आहे.