Coronavirus : ‘कोरोना’ला रोखण्यात यश आलं असलं तरी गाफील राहू नका : CM उद्धव ठाकरे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाण्यानं कोरोना संकट रोखण्यासाठी केलेले उपाय हे कौतुकास्पद आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसंच यापुढेदेखील गाफील राहू नका. कारण कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो. कारण आता सणांचे दिवस आहे. त्यामुळं काळजी घ्या अशा सूचनाही सीएम ठाकरेंनी दिल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजना करण्यात आल्या आहे त्या निश्चितच चांगल्या आहेत. कोरोना रुग्णांची घटणारी संख्या, उपाचर करून घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या यावरून ठाण्यानं कोरोनाचे संकट रोखण्यासाठी केलेले उपाय हे निश्चितच कौतुकास्पद आहे असंही ते म्हणाले आहेत. कोरोनासाठी केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी सीएम ठाकरे ठाण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुखय सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के आणि इतर अधिकारीही या बैठकली उपस्थित होते.यावेळी बोलताना सीएम ठाकरे यांनी ठाण्यात आल्यानंतर समाधान वाटत असल्याचं सांगितलं. ठाणे जिल्ह्यानं कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळवलं आहे हे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं. असं असलं तरीही कोरोना विरूद्धचा हा लढा सुरूच ठेवायचा आहे. पुन्हा मी जेव्हा ठाण्यात येईल तेव्हा ठाणे कोरोनामुक्त झालेलं पाहायला मला आवडेल असंही ते म्हणाले. महापालिका आयुक्तांनी कोरोना बाबत कशा उपाय योजना केल्या, कोविड केअर सेंटरचा कसा फायदा झाला हे सांगितलं. मुंब्रा पॅटर्न कसा यशस्वी केला, रुग्णांचा शोध कसा घेतला याचीही माहिती सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनी दिली.

सीएम ठाकरे असंही म्हणाले की, “मुंब्रा पॅटर्नबद्दल समाधान वाटत आहे. हा पॅटर्न इतर भागात राबवण्यात यावा. यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सांगा, निधी हवा असेल तर तो देखील देऊ आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखा. कोरोनाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करा. सणासुदीचे दिवस आहेत. त्यानुसार या काळात कोरोनाबद्दल काळजी कशी घेतली पाहिजे याची माहिती देखील नागरिकांना द्या. कोरोना दक्षता समिती ही प्रत्येक वार्डात स्थापन करावी” अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सीएम ठाकरे असंही म्हणाले की, “लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे. दैनंदिन व्यवहार सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र यामुळं गाफील राहून चालणार नाही. सतर्क रहावे लागणार आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा, वैयक्तीक व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणं गरजेचं आहे. पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करू नका” अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.