Coronavirus News : राज्यात ‘कोरोना’ची येणार दुसरी लाट ? IMA च्या राज्य अध्यक्षांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रसार कमी होऊन मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या देखील घटली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचा दर ९० टक्क्यांवर गेला होता. मात्र, आता राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे मत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्ण वाढीचा आलेख चढता आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयएमएचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे लक्ष वेधले आहे. ऑक्टोबरच्या शेवटी दररोज सापडणाऱ्या रुग्ण संख्या सहा हजारांपर्यंत गेली. २६ ऑक्टोबरला ३६४५ रुग्णांची नोंद करण्यात आली. २७ ऑक्टोबरला ५३५६, २८ ला ६७८३ तर २९ ऑक्टोबरला ५९०२ रुग्ण सापडले. ३० ऑक्टोबरला ६१९० आणि ३१ ऑक्टोबरला ५५४८ रुग्ण आढळून आहे.

रुग्णवाढ चिंता वाढवणारी

महाराष्ट्रात सप्टेंबरच्या महिन्यात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या २३ हजारांपर्यंत गेली होती. त्यानंतर तेव्हा आलेली लाट ओसरली, पण आता पुन्हा वाढती रुग्ण संख्या चिंता वाढवणारी आहे. टाळेबंदीत शिथिलता आणल्याने नोव्हेंबर महिन्या अखेरीपासून दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, चाचण्यांची क्षमता आणि रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध यावरती यंत्रणांनी भर देणे गरजेचे असल्याचे मत, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले.