Coronavirus : मुंबई, पुण्यानंतर आता ठाण्यात देखील आढळले ‘कोरोना’चे रुग्ण, महाराष्ट्रातील संख्या 14 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतात हळूहळू पसरणाऱ्या कोरोनाचे राज्यात १४ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई, पुणे पाठोपाठ आता ठाण्यात सुद्धा कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत सापडलेल्या रुग्णाची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ठाण्यातील रुग्ण फ्रान्सवरून आणि मुंबईतील रुग्ण हे दुबईवरून आले आहेत.

कोरोना बाबत नागरिकांमध्ये जाहिरातींद्वारे जनजागृती करण्याचे काम सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

चीनमधील कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे. कोरोनाचे रुग्ण आता भारतातही सापडल्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने आवश्यक ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जगाच्या कोणत्याही भागातून भारतात येणाऱ्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी करूनच प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

गर्दीच्या ठिकाणी जाणे, संसर्ग टाळणे खूप महत्वाचे आहे. राज्यात कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नाहीत आणि नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. पुण्यात अजून एक कोरोनाचा रुग्ण आढळला असून तो अमेरिकेतून पुण्यात आला आहे. दरम्यान, पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता ९ वर पोहोचली आहे. पुण्यात ९, मुंबईत ३, ठाणे व नागपूर मध्ये प्रत्येकी १ असे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यामुळे राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या १४ पर्यंत जाऊन पोहोचली आहे.