‘कोरोना’ची लस लवकरच बाजारात, पण सर्वात आधी कोणाला मिळणार ? यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील अनेक संशोधक लस शोधण्यात व्यस्त आहेत. अनेक लसींच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी लस आणि हर्ड इम्युनिटी हेच दोन मुख्य पर्याय आहेत. त्यातील कोरोना लसीच्या पर्यायाचा विचार करता सर्वात आधी कोणाला लस दिली जाणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक देशाचं याबाबतचे धोरण वेगवेगळे आहे.

यांना प्राधान्य मिळण्याची शक्यता

भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येकाला कोरोनाची लस देणं अतिशय मोठं काम आहे. यासाठी बराच कालावधी लागून शकतो. त्यामुळे सर्वात आधी कोरोना लस कोणाला द्यायची हा प्रश्न आहे. यामध्ये कोरोना लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, पालिकेतील कामगार आणि पोलिसांना ही लस प्राधान्याने मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाशी झुंज देणारी आघाडीची फळी सुरक्षित असणं गरजेचं असल्याने या योद्ध्यांना आगोदर कोरोनाची लस दिली जाऊ शकते.

वृध्दांना देखील प्राधान्य मिळू शकते

कोरोनाचा सर्वात धोका वृध्दांना आहे. त्यामुळे वृद्धांनादेखील प्राधान्य मिळू शकते. मात्र, त्यासाठी लशीचे साईड इफेक्ट्स तर होत नाहीत ना, हे देखील विचारात घेतले जाईल. यानंतर कोरोनाचा सर्वाधिक फैलाव ज्या परिसरात झाला आहे. त्या भागात लसीकरण करण्यात येईल. कोरोना संक्रमणाचा वेग सर्वाधिक असलेल्या भागातील नागरिकांना देखील ही लस दिली जाईल. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखता येईल.

उपलब्धता आणि त्याची किंमत

भारतात 130 कोटी लोकसंख्या आहे. त्यामुळे लसीची उपलब्धता आणि त्याची किंमत या दोन महत्त्वाच्या बाबी असतील. या गोष्टींचा विचार करुन सरकारला योजना आखावी लागेल. उपलब्ध झालेल्या कोरोना लसींचा सर्वाधिक आवश्यकता असलेल्या भागांमध्ये, समूहांमध्ये वापर करून कोरोना रोखण्याचे मोठं आव्हान सरकार समोर असणार आहे.

लस पूर्णपणे उपयुक्त असेल असं नाही

जागतिक पातळीवरचा विचार केला तर जगाची लोकसंख्या 8 बिलीयनच्या घरात आहे. त्यामुळे सगळ्यांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी काही वर्षाचा कालावधी जाऊ शकतो. त्यातही कोरोनावरील लस पूर्णपणे उपयुक्त असेल असंही नाही. अमेरिकेतील प्रख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. अँथॉनी फॉसी यांनी तर 70 ते 75 टक्के उपयुक्त असलेली लस मिळाली तरी आपण भाग्यवान असू असं म्हटलं आहे.