धक्कादायक ! ‘कोरोना’ प्रतिबंधित क्षेत्रात उपासमारीमुळे वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू ?

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक भयानक घटनाही घडल्या आहेत. अशीच घटना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या सोलापुरातील शास्त्रीनगर झोपडपट्टीत घडली आहे.
एका घरात वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह सापडले असून त्यांचा उपासमारीमुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे दाम्पत्याचा गतिमंद मुलगा दोन दिवसांपासून आईवडील वारल्याचे सांगत होता. मात्र, त्याची आर्त हाक सरकारी यंत्रणा आणि शेजारच्यांनी गांभीर्याने घेतलीच नाही.

अब्दुल गनी शिलेदार (वय 65) आणि त्यांच्या पत्नी हसीना (60) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. दाम्पत्य गतिमंद मुलासह शास्त्रीनगरमधील एका झोपडीत राहात होते. वयोमानामुळे तसेच प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांना घरात जेवण बनवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्यांचे काही नातलग त्यांना दररोज जेवणाचा डबा पोहोचवत तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करत. मात्र, या झोपडपट्टीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने गेल्या 10 दिवसांपासून हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला होता.

त्यामुळे शिलेदार कुटुंबाच्या रोजच्या जेवणाची आबाळ होऊ लागली. नजीकच्या भागात राहणार्‍या त्यांच्या एका नातलगाने 5 मे रोजी कसेबसे शास्त्रीनगरमधील शिलेदार यांचे घर गाठून त्यांना जेवणाचा डबा पोहोचवला. मात्र, त्यानंतर त्यांना येथे येणे शक्यच झाले नाही. यातूनच उपासमार आणि प्रकृती बिघडल्यामुळे या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आईवडिलांचा मृत्यू झाल्याचे त्यांचा गतिमंद मुलगा इसाक याने गल्लीत राहणार्‍या काहींना सांगितले होते. मात्र, गतिमंद असलेल्या इसाकचे म्हणणे कुणीच गांभीर्याने घेतले नाही. दोन दिवसांनंतर या घरातून दुर्गंधी सुटू लागल्यानंतर काही शेजार्‍यांनी शिलेदार यांच्या घरात धाव घेतली. निपचित पडलेल्या वृद्ध दाम्पत्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. दोन दिवसांपूर्वीच या दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण मात्र, अद्याप स्पष्ट झालेले नाही. वृद्धत्व, अशक्तपणा आणि उपासमारीमुळे हा प्रकार घडला असावा, असा संशय व्यक्त होत आहे.