Coronavirus : रतन टाटांनी ‘कोरोना’विरूध्दचा अंधःकार दूर करण्यासाठी ‘दिवा’ देखील लावला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशहितासाठी आर्थिकदृष्ट्या असो व श्रद्धेने टाटा उद्योग समूह किंवा रतन टाटा हे देशाच्या प्रत्येक लढाईत हिरीरीने भाग घेताना दिसतात. अलीकडेच टाटा उद्योग समूहाने दीड हजार कोटींची मदत कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सरकारला देऊ केली. देशात येणाऱ्या अनेक संकटानसाठी टाटा समूहाचा नेहमी पुढाकार असतो. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी ५ एप्रिल रोजी,रात्री ९ वाजता आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, लावून आपल्या देशात कोणी एकटे नसल्याचा संदेश देण्यासाठी आवाहन केले होते. प्रधानमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवे लावायच्या मोहिमेत रतन टाटा यांनीही सहभाग नोंदविला. रतन टाटा यांनी दिवा लावलेला फोटो सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यात रतन टाटा यांनी निधीही दिला आणि दिवाही लावला अशा प्रतिक्रिया उमटत आहे.

देशात कोरोनाचा प्रभाव काही दिवसांमध्ये खूप वेगाने वाढला आहे. त्यात मुंबईत खूप बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा गंभीर वातावरणामध्ये डॉक्टर तसेच आरोग्य खात्यातील कर्मचारी वर्ग दिवस रात्र कोरोना विरोधात लढा देताना दिसत आहे. आणीबाणीची स्थिती व संसर्गाचा धोका असल्याने डॉक्टरांना घरी जाणे अशक्य होते. त्यामुळे डॉक्टरांच्या निवास्थानाची सोय करण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर होते. दरम्यान, अशा डॉक्टरांसाठी टाटा समूहाने आपले ७ पंचतारांकित हॉटेल डॉक्टरांना राहण्याकरिता आणि विश्रांतीकरिता दिल्याने प्रशासनासमोरील मोठा प्रश्न दूर झाला. तसेच यापूर्वी, कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी टाटा समूहाने सुमारे दीड हजर कोटी रुपयांची मदत दिली आहे आणि मुंबईतील विविध रुग्णालयातील कर्मचारी वर्गाला भोजन पुरवण्याची व्यवस्था देखील टाटा समूहाने केली आहे.

टाटा समूह आणि रतन टाटा यांच्या दानशूर आणि देशप्रेमाच्या भावनेवर सोशल मीडियावरती अनेक नेटीझन्स फिदा आहे. टाटा यांनी १५०० कोटी रुपयांची मदत घोषित केल्यांनतर, टाटा नमक… देश का नमक अशा टॅगलाईन वापरून अनेकांनी रतन टाटा यांचा फोटो शेयर केला. मात्र, आता कोरोनाचा अंध:कार दूर करण्यासाठी हातात दिवा घेऊन पुढे आलेल्या रतन टाटा यांचा दुसरा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियामध्ये अनेकांनी फोटो शेयर करत राष्ट्रहित.. देशभक्त …असे टॅगलाईन वापरले. तसेच अनेकांनी मोदींच्या या आवाहनाला विरोध केला, मात्र रतन टाटा यांनी निधीही दिला आणि दिवाही लावला आपल्या कृतीतून देशासाठी प्रत्येक गोष्ट आपण करायला तयार असल्याचे रतन टाटा यांनी दाखवून दिले अशा प्रतिक्रिया सोशल मीडियात उमटल्या.