‘समय बडा बलवान’ ! इजिप्तनं ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पाठवली अमेरिकेला मदत

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   अमेरिकेकडून सर्वाधिक मदत मिळवणार्‍या अव्वल देशांपैकी एक असलेल्या इजिप्तने मंगळवारी वैद्यकीय साहित्याने भरलेले विमान अमेरिकेत पाठवले. कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात इजिप्तने अमेरिकेला ही मदत केली आहे.

इजिप्तमध्ये जनरलपासून राष्ट्राध्यक्ष बनलेले अब्देल फतह अल-सीसी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अधिक चांगले संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण कोरोना विरूद्धच्या लढ्यात इजिप्तने चीन आणि इटलीला देखील वैद्यकीय साहित्य पाठवले आहे.

सिसीच्या कार्यालयाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून त्यात म्हटले आहे की इजिप्शियन लोकांच्या वतीने अमेरिकेला मदत. व्हिडिओमध्ये मिलिटरी कार्गो विमानात वैद्यकीय पुरवठा लोड करताना दाखवले गेले आहे.

अमेरिकन नेते डच रूपर्सबर्गर यांनी माहिती दिली की, इजिप्तहून पाठवलेले विमान वॉशिंग्टनजवळील अँड्र्यू एअरफोर्स स्टेशनवर लँड केले आहे. विमानात २ लाख मास्क, ४८ हजार शू कव्हर्स, २० हजार सर्जिकल कॅप्स आणि इतर वस्तू होत्या.

डच रुपर्सबर्गर यांनी ट्विटरवर लिहिले – यासाठीच इजिप्तसारख्या देशांशी आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी आणि संबंध असणे महत्वाचे आहे. हे केवळ संकटाच्या वेळीच नव्हे, तर दररोज देखील आवश्यक आहे.

त्याचवेळी कैरोमधील अमेरिकन राजदूत जोनाथन कोहेन यांनीही अमेरिकन लोकांच्या वतीने इजिप्तचे आभार मानले. इजिप्तमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २६४ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३,४९० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. तर कोरोनामुळे अमेरिकेत ४५००० पेक्षा जास्त लोक मरण पावले आहेत.

अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, इजिप्त यावेळी इतर देशांना मदत करण्याच्या स्थितीत आहे की नाही. इजिप्तची एक तृतीयांश लोकसंख्या ११५ रुपये किंवा त्याहूनही कमी पैशात आपला दिवस काढतात. ते एका मास्कसाठी ५० रुपये खर्च करु शकतात.