Advt.

COVID-19 : … तर कडक कारवाई करणार, राज्य सरकारचा पतंजलीला इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गावर उपचारासाठी पतंजलीने तयार केलेलं ‘कोरोनील’ हे औषध सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडलं होत. पहिल्यांदा ५ ते १४ दिवसांत रुग्ण बरा होत असल्याचा दावा करणाऱ्या पंतजलीने नंतर यू-टर्न घेत हे औषध केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असल्याचा दावा केला होता. त्यानंतर या औषधाचा विक्रीस परवानगी मिळाली होती. मात्र आता कोरोनीलवरुन राज्य सरकाने पुन्हा एकदा पंतजलीला इशारा देण्यात आला आहे.

रामदेव बाबा यांच्या पंतजलीने तयार केलेल्या कोरोनील या औषधमुळे कोरोना संसर्ग बरा होत नाही. पण या औषधामुळे कोरोना संसर्ग बरा होत असल्याचा दावा या कंपनीने केल्यास तसेच यासंदर्भात संभ्रम निर्माण करुन नागरिकांनाही दिशाभूल केल्यास पंतजलीवर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिला.

शिंगणे पुढं म्हणाले, पंतजलीने औषधाला दिलेलं कोरोनील हे नाव आणि प्रसारमाध्यमातून त्याचा सुरु असलेला प्रचार यामुळे लोकांच्यात संभ्रम निर्माण होत आहे. पंतजलीने तयार केलेल्या या कोरोनिलचा वापर फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. त्याने कोरोना संसर्ग बरा होत नाही. तसेच आरोग्य मंत्रालयाने या औषधाला फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे औषध म्हणून मान्यता दिली आहे. कोरोना संसर्गावरील औषध म्हणून मान्यता दिलेली नाही, असं सुद्धा शिंगणे यांनी सांगितलं.

यापूर्वी गृहमंत्र्यानी सुद्धा दिला होता कारवाईचा इशारा

पतंजलीने कोरोनिल हे औषध तयार केल्यानंतर आयुष मंत्रालय अथवा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल सायन्सची परवानगी घेतली नव्हती. कोणतेही औषध तयार केल्यावर संबंधित ऑथोरिटीकडून परवानगी घेणे आवश्यक होते. मात्र पतंजलीने ही परवानगी घेतली नाही. म्हणून कोरोनिलची महाराष्ट्रात जाहिरात किंवा विक्री केल्यास पंतजलीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला होता.