Lockdown : लॉकडाऊनचे 3 तेरा ! ‘इथं’ ताडीच्या गुत्त्यावर तळीरामांनी केली तोबा गर्दी

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राज्यभरात लॉकडाउनमुळे दारूचे सर्वच दुकाने बंद असल्याने तळीरामांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यामुळे आता तळीरामांची पावले ताडीच्या गुत्त्याकडे वळू लागली आहे. त्यामुळे ताडीच्या गुत्त्यावर मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, येथे सामाजिक अंतराचे नियम पाळले जात नसल्याने करोनाची भीती व्यक्ती केली जात आहे.

वसई, विरारमधील सर्वच दारूचे दुकाने बंद आहेत. त्यामुळे चोरीछुप्या पद्धतीने काही ठिकाणी दारू विकली जात असून भाव गगनाला भिडले आहेत. अधिक टाळेबंदीत आर्थिक झळ सोसणार्‍या नागरिकांना दारूसाठी हजारो रुपये मोजावे लागत असल्याने आता त्यांनी स्वस्तात मिळणार्‍या ताडीकडे आपला मोर्चा वळवला आहे. वसई, विरारमधील ताडी विक्री केंद्रावर रांगाच्या रांगा लागत आहेत.

पहाटे चार  वाजल्यापासून तळीराम हातात बाटल्या घेऊन रांगेत उभे राहत आहेत. यात सारेच नियम पायदळी तुडवले जात आहेत. येथे येणारी लोक साधा तोंडाला रुमालसुद्धा बांधत नाहीत. यामुळे या लोकांना कोरोनाच्या संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. विरार पश्चिम येथील बोळींज येथील एका ताडी विक्रीकेंद्रावर पहाटे चार वाजल्यापासूनच तळीराम आपला तळ ठोकून उभे राहत आहेत. येथे ही 50 रुपये लिटर दराने केवळ 2 लिटर ताडी एका व्यक्तीला दिली जात आहे.

यावेळी लोक मोठी गर्दी करत रांगेत एकमेकांना शेजारी उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. टाळेबंदी असतानाही ताडीचे गुत्ते सरू असल्याने आसपासच्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.