Coronavirus : देशात प्रथमच 24 तासात 437 कोरोनाचे नवीन रुग्ण ; मृतांची संख्या 41 वर, देशात 2036 ‘कोरोना’बाधित

नवी दिल्ली : देशभरात कोरोना विषाणूचे संक्रमण वेगाने वाढत असून बुधवारी एकाच दिवशी देशात 437 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रातील आहे.

महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल ३२५ झाली आहे. बुधवारी एकाच दिवशी ३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३० एकट्या मुंबईमधील आहेत. त्यामुळे मुंबईमधील कोरोना बाधितांची संख्या २३८ झाली आहे.

तामिळनाडुत एकाच दिवशी ११० नवे कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे तेथील कोरोनाग्रस्तांची संख्या २३४ झाली आहे. केरळमध्ये २४ नवे रुग्ण आढळून आले असून त्यांची संख्या २६५ झाली आहे.

आंध्र प्रदेशात बुधवारी एकाच दिवशी ६७ नवीन कोरोना बाधित आढळल्याने राज्यातील रुग्णांची संख्या १११ झाली आहे. तेलंगणामध्ये काल ३० नवे रुग्ण आढळून आले असून तेलंगणातील एकूण रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी तेलंगणाने कठोर उपाययोजना केल्याने नव्याने रुग्ण आढळणार नाहीत. त्यामुळे तेलंगणा ७ एप्रिल रोजी कोरोना मुक्त होईल असा दावा केला होता. त्यानंतर काल एकाच दिवशी ३० नवे कोरोनाबाधित आढळून आले होते.

राजस्थानमध्ये बुधवारी २७ नवीन रुग्ण आढळले असून राजस्थानमधील कोरोना बाधितांची संख्या १२० झाली आहे. आतापर्यंत देशभरातून १५२ कोरोना बाधित बरे झाले असून उपचारानंतर घरी गेले आहेत. तर आतापर्यंत देशात कोरोनामुळे 41 जणांचा मृत्यु झाला आहे.