महापौरांच्या कुटुंबियानंतर ‘या’ नगरसेवकाच्या आई-वडिलांना कोरोना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना संकट काळात नागरिकांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या नगरसेवक, अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि पोलीस यांना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. पुण्यातील प्रभाग 25 वानवडी येथील भाजपचे नगरसेवक तथा शहर सुधारणा समितीचे उपाध्यक्ष धनराज घोगरे यांच्या आई – वडीलांना कोरोनाची लागण झाली आहे.

नगरसेवक धनराज घोगरे यांच्या आईला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर त्यांचे वडिलांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आज त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे पुण्यात आणि महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत शनिवारी 819 रुग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 20 हजार 668 झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या 399 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील विविध रुग्णालयात 385 रुग्ण अत्यावस्थ असून शनिवारी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुणे शहरात 7 हजार 276 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत.