अमेरिकेत डिसेंबरमध्येच कोरोनाची लस उपलब्ध होणार !

न्यूयॉर्क :  वृत्तसंस्था –   जगभरात काेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमेरिकेतही काेरोनाबाधितांची संख्या ( COVID-19) एक कोटींहून अधिक झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूवर (Corona Vaccine) प्रभावी आणि सुरक्षित लस केव्हा येईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता डिसेंबर महिन्यात (December) अमेरिकेत लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. फायजर कंपनीने विकसित केलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर आले असून, ही लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याचे आढळून आले आहे.

अमेरिकेचे आरोग्यमंत्री एलेक्स अजार म्हणाले की, फायजर कंपनी आपल्या काेरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष आरोग्य प्राधिकरणाला लवकरात लवकर सोपवू शकतात. अमेरिकन सरकारने लसीकरण मोहिमेची तयारी केल्याचे सांगितले. फायजर कंपनीने ही काेरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. सोमवारी, फायजरकडून चाचणीबाबत माहिती दिली. सुरुवातीच्या निष्कर्षानुसार,लशीचा पहिला डोस दिल्यानंतर 28 दिवसांत आणि दुसऱ्या डोसनंतर सात दिवसांमध्ये संबंधित व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती निर्माण झाली. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या पहिल्या भागात ही लस काेरोनाला अटकाव करण्यास प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे फायजरचे अध्यक्ष आणि सीईओ अल्बर्ट बोर्ला यांनी सांगितले.

अजार म्हणाले की, सरकारला दर महिन्याला फायजरने विकसित केलेली जवळपास दोन कोटी लशीचे डोस उपलब्ध होतील. अमेरिकन सरकार आणि फायजर यांच्यात लशीसंदर्भात 1.95 अब्ज डॉलरचा करार झाला असून, 50 लाख नागरिकांसाठी लस उपलब्ध होणार आहे. लशीला मंजुरी देण्यासाठी चाचणीच्या डेटाची प्रतीक्षा असून, त्यानंतर अन्न व औषध प्रशासन याबाबत निर्णय घेईल, असेही त्यांनी सांगितले. अजार यांनी सांगितले की, मॉडर्ना इंकसह इतर कंपन्यांकडून लस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या महिना अखेरीस काही लस चाचणीचे प्राथमिक निष्कर्ष समोर येण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले. लशीला मंजुरी मिळाल्यानंतर रुग्णालयात दाखल असलेले वृद्ध, आरोग्य कर्मचारी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.