डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला इशारा, म्हणाले – ‘तुम्ही मदत केली तर ठीक, अन्यथा…’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या महामारीविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताकडे मदत मागितली आहे. यावेळी त्यांनी धमकीवजा इशाराही दिला आहे. त्यांनी पुन्हा भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी भारताने मदत नाही केली तर काही हरकत नाही, पण मग त्यांनी आमच्याकडूनही तशी अपेक्षा ठेवू नये असे म्हटले आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत कोरोनाविरुद्ध लढ्यात मदतीची विनंती केली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना , मी रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. जर तुम्ही आम्हाला हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन औषधाचा पुरवठा केलात तर आम्ही तुमचे आभारी असू असे म्हटले आहे. पण जर त्यांनी पुरवठा केला नाही, तरी काही हरकत नाही. पण मग आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, आणि ते आम्ही का करु नये ? असा सवालही विचारला आहे.

अमेरिकेत कोरोनाने थैमान घातले असून तीन लाखांहून अधिक लोकांना लागण झाली आहे. तर 10 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेला कोरोनाचा खूप मोठा फटका बसला आहे. त्यावर लस मिळावी यासाठी अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. जगभरातील वैज्ञानिक यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान जगभरात 13 लाख 28 हजार 150 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी दोन लाख लोकांना उपचार करुन घरी पाठवण्यात आलेले आहे. दुसरीकडे भारतात 4 हजार 778 लोकांना करोनाची लागण झाली असून मृतांची संख्या 136 वर पोहोचली आहे.