Coronavirus : ‘लॉकडाऊन’ दरम्यान शहरातून गावाकडं परतले मजूर, घरात वेगवेगळया खोल्या नसल्यानं चक्क झाडावर झाले ‘क्वारंटाईन’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता देशात 21 दिवसांपर्यंत लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. यामुळे शहरांमध्ये काम करणारे मजूर आपापल्या गावी परतत आहेत. गावात परत जाणाऱ्यांना खबरदारी म्हणून 14 दिवस वेगळे राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

त्याच वेळी, पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यात चेन्नईहून परत आलेल्या काही लोकांनी झाडावर स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले आहे. सांगण्यात आले की या लोकांना त्यांच्या स्वत:च्या घरात सेल्फ आयसोलेशनसाठी वेगळी खोली नसल्याने त्यांना असे करावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी झाडाला खाटा बांधून स्वत:ला इतरांपासून वेगळे केले आहे.

लॉकडाउनमुळे हे सर्व जण चेन्नईहून आपल्या गावी परत आले आहेत. गावी जाण्यापूर्वी त्यांनी आरोग्य केंद्रात वैद्यकीय तपासणी करून घेतली आणि तेथे डॉक्टरांनी त्यांना 14 दिवस अलग राहण्याचा सल्ला दिला.

ते म्हणतात की रात्री बाहेर झोपण्याची भीती होती कारण हत्ती सहसा गावाबाहेर येतात. अशात त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी त्यांच्या खाटांना झाडाच्या वर बांधले. याद्वारे ते प्राण्यांच्या हल्ल्यापासून वाचत आहेत आणि कोरोनाच्या धोक्यापासून इतर लोकांना देखील वाचवत आहेत.

गावकरी आणि कुटुंबीय त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करीत आहेत. लोक त्यांचे जेवण झाडाखाली जाऊन ठेवतात. गावकरी निघून गेल्यानंतर हे कामगार खाली येतात आणि आपले जेवण घेऊन वरती जातात.