जिल्ह्यातील 60 मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नगर व शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण ६० केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात येणार आहे. सदर चिठ्ठ्यांची मोजणी ईव्हीएम मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर सुरू करण्यात येणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले. त्यानंतरच अधिकृत निकाल जाहीर करण्यात येईल.

जिल्ह्यातील नगर लोकसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी, तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान झाले आहे. २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अतिरिक्त जिल्‍हाधिकारी पी. एल. सोरमारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभागाने मतमोजणीची तयारी सुरू केली आहे. एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या दक्षिणेकडील गोदाम क्रमांक एकमध्ये नगर मतदारसंघाची व गोदाम क्रमांक तीनमध्ये शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी करण्याचे निवडणूक विभागाने नियोजन केले आहे.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी 14 टेबल

तमोजणी करताना विधानसभा मतदारसंघानिहाय एकूण १४ टेबल ठेवले जाणार आहेत. नगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, नगर शहर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामुळे नगर मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी ८४ व शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी ८४ टेबल ठेवले जाणार आहेत.

प्रत्येक टेबलवर मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, सूक्ष्म निरीक्षक व शिपाई, असे चार कर्मचारी राहणार आहेत. यासर्व टेबलांवरील ईव्हीएमची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांच्या व्हीव्हीपॅट चिठ्ठ्या मोजून त्या ईव्हीएमशी जुळवून पाहण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार आ

कशी होणार ‘व्हीव्हीपॅट’ची निवड

एका विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी करायची आहे. ही पाच मतदानकेंद्रे निवडताना सर्वात प्रथम संबंधित विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदानकेंद्रांच्या नावाच्या चिठ्ठ्या तयार करून त्या एका खोक्यामध्ये टाकण्यात येतील. त्यानंतर त्यामधून पाच चिठ्ठ्या काढण्यात येणार आहेत. त्यावर ज्या मतदानकेंद्रांची नावे असतील, त्या मतदानकेंद्रांवरील व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like