MS धोनीच्या निवृत्तीवर रवी शास्त्रींचं मोठं विधान, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी मोठे विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीला रवी शास्त्री यांनी संकेत दिले आहेत की, धोनी लवकरच आपल्या वनडे करियरचा शेवट करणार आहे. तथापि, महेंद्रसिंग धोनी टी२० क्रिकेट खेळणे सुरु ठेऊ शकणार आहे. विशेष म्हणजे धोनीने कसोटी क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली आहे. रवी शास्त्रींनी दिलेली ही माहिती खरी ठरली तर धोनी या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी२० वर्ल्ड कप मध्ये खेळताना दिसू शकेल.

रवी शास्त्रींना एक प्रश्न विचारला असताना ते म्हणाले की, धोनी बरीच वर्षे तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळत होता. त्यानंतर तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि आता तो एकदिवसीय क्रिकेटदेखील सोडू शकतो. यानंतर धोनी फक्त टी-२० क्रिकेट खेळणार आहे. यासाठी त्याला पुन्हा खेळायला सुरुवात करावी लागणार आहे.

आयपीएलवर अवलंबून टी-२० क्रिकेटचे भविष्य
रवि शास्‍त्री यांनी एका उत्तरात सांगितले की, महेंद्रसिंग धोनीची टी -२० कारकीर्द अजूनही जिवंत आहे. तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे. तसेच ते म्हणाले की, धोनीबद्दल मला एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे तो कधीही संघावर स्वत:ला थोपत नाही. जर त्याला वाटले की तो व्यवस्थित खेळ करू शकत नाही तर तो कसोटी क्रिकेटप्रमाणे सांगेल की मी पुरेसे क्रिकेट खेळलो आहे. जर त्याने आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी बजावली तर तो पुढेही या स्वरुपात खेळी करू शकतो.

धोनी खेळणार टी-२० वर्ल्ड कप
ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी -२० विश्वचषकात महेंद्रसिंग धोनी भारतीय संघाचा भाग असणार हे देखील रवी शास्त्री यांनी संकेत देऊन स्पष्ट केले आहे. जुलै २०१९ पासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला जरी नसला तरी निवृत्तीबाबत अजून तरी थेट बोलला नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियामधील त्याचा अनुभव संघासाठी उपयुक्त ठरू शकणार आहे. विशेष म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमधील धोनीचे खेळणे हादेखील वर्ल्ड कपच्या तयारीचाच एक भाग आहे असे मानले जात आहे. तथापि, त्याआधी धोनी न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान मिळवू शकेल काय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एमएस धोनीचे करिअर प्रोफाइल
महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाकडून ९० कसोटी सामन्यात ३८.०९ च्या सरासरीने ६ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावत ४८७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर ३५० एकदिवसीय सामन्यात त्याने ५०.५७ च्या सरासरीने १० शतके आणि ७३ अर्धशतके झळकावत १०७७३ धावा केल्या आहेत. तसेच ९८ टी -२० सामन्यात ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा झळकावल्या आहेत. त्याने कसोटीत २५६ कॅच आणि ३८ स्टॅम्पिंग केले आहेत तर वन डेमध्ये ३२१ कॅच आणि १२३ स्टॅम्पिंग केले. त्याचबरोबर धोनीने टी -२० क्रिकेटमध्ये ५७ कॅच आणि ३४ स्टॅम्पिंग केले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/