रिषभ पंतच्या आई आणि बहिणीवर ‘गंभीर’ आरोप, पोलिसांकडून तपास सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत याचे कुटुंब सध्या चर्चेत आहे. पंतच्या आई व बहिणीविरूद्ध त्यांच्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कुकने तक्रार दाखल केली आहे. पंत याचे कुटुंबीय दिल्ली-हरिद्वार महामार्गावर एक बेक टू बेस नावाचे रेस्टॉरंट चालवत आहे, जिथे आरोप करणारा कुक काम करत होता.

पंतच्या आईवर धमकावल्याचा आरोप

एका वृत्तसंस्थेनुसार, फैज आलम नावाच्या तरुणाने पंतची आई व बहिणीने त्याला दोन महिन्यांचा पगार न दिल्याचा आरोप केला आणि पगार मागितल्यावर रिषभ पंतच्या नावाने धमकावले. ३० मार्च २०२० रोजी अल्पसंख्यांक आयोगाला फैजने पाठवलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, रुड़कीतील दिल्ली-हरिद्वार महामार्गावर, क्रिकेटपटू रिषभ पंतची बहीण साक्षी पंत बेक टू बेस रेस्टॉरंट चालवते, जिथे त्याने डिसेंबरमध्ये काम करण्यास सुरवात केली होती.

तेव्हा पगार ९५०० रुपये निश्चित केला होता. मात्र फैजचा आरोप आहे की, त्याला डिसेंबरनंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पगार दिला नाही. ५ मार्च रोजी हॉटेल बंद होणार असल्याचे सांगत आता कामावर येऊ नका असे सांगितले. जेव्हा फैजने दोन महिन्यांच्या पगाराची मागणी केली, तेव्हा त्याला धमकी देण्यात आली. फैज म्हणाला, ‘पंतची आई सरोज म्हणाल्या की त्यांचा मुलगा राष्ट्रीय स्तराचा क्रिकेटर आहे. सर्व अधिकारी त्याला ओळखतात, जर पुन्हा पैसे मागितले तर पोलिसांकडे देईल.’

पोलिसांनी तपास सुरु केला आहे

फैजने बेरोजगार झाले असल्याचे सांगितले. त्याला वडील नाहीत आणि घरात दोन बहिणी व आईचा खर्च तोच करतो. अशात तो सध्या अतिशय कठीण परिस्थितीत आहे. या संबंधी सीओ रुड़की चंदनसिंग बिष्ट म्हणाले की, आयोगाशी संबंधित पत्राचा तपास करण्याचे आदेश एसएसपी कार्यालयातून मिळाले आहेत. सिव्हिल लाईन्स कोतवाली पोलिसांना चौकशीचे निर्देश दिले गेले होते. मात्र, आतापर्यंत या मुद्द्यावर पंत किंवा त्याच्या कुटुंबीयांकडून कोणतेही विधान केलेले नाही.