रागात जवानाच्या चेहर्‍यावर ‘गरम’ पाणी फेकणार्‍या DIG ला CRPF नं दिली ‘ही’ शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारच्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात एक जवानावर गरम पाणी फेकणाऱ्या आरोपी डीआयजी अधिकाऱ्याचं बिहारमधून मणिपूरला ट्रान्सफर करण्यात आलं आहे. डी के त्रिपाठी असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. सध्या त्यांची पोस्टींग बिहारमधील मोकामाघाट येथे होती. आता त्यांचं मणिपूर आणि नागालँड सेक्टरमध्ये ट्रान्सफर झालं आहे. दरम्यान सूत्रांनी सांगितलं आहे की, जवानावर गरम पाणी फेकण्याच्या त्यांच्या प्रकरणाचा सविस्तर तपास अद्यापही प्रलंबित आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, याचा प्राथमिक तपास झाला असून डीआयजीचं ट्रान्सफर करण्यात आलं आहे. सध्या पूर्ण तपास बाकी आहे.

नेमकं प्रकरण काय ?

बिहारच्या राजगीरमध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात एका डीआयजीने आपल्याच जवानावर गरम पाणी फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. डी के त्रिपाठी असं त्या अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला होता. सूत्रांनी माहिती दिली होती की, जवानाचा मोबाईलही हिसकावून घेण्यात आला आहे. त्याच्याशी कोणाचाही संपर्क होऊ दिला जात नाही. त्याच्यावर दबाव टाकून असं सांगण्याचा प्रयत्न केला जात होता की, चुकून थर्मासमधील गरम पाणी त्याच्यावर पडलं आहे. दरम्यान अधिकाऱ्याने गरम पाणी फेकल्याने जवानाचा चेहरा, छाती आणि गळा भाजला होता. अधिकाऱ्याने त्या जवानाच्या जर्सीतही गरम पाणी टाकलं होतं असंही समजत आहे.

64 बटालियनचा जवान अमोल खरात अटॅच ड्युटीमुळे राजगीर मधील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होता. परीक्षा सुरू होत्या. यासाठी बनवलेल्या बोर्डमध्ये बाहेरूनही अनेक अधिकारी आले होते. अमोलची ड्युटी जीओ मेसमध्ये होती. बोर्डमध्ये आलेल्या डीआयजी त्रिपाठीने त्याला गरम पाणी आणण्यास सांगितलं. त्यानुसार त्या अधिकाऱ्याला थर्मासमध्ये गरम पाणी देण्यात आलं. त्याने अमोल या जवानावरच ते पाणी फेकलं.

सीआरपीएफ मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने या घटनेल दुजोरा देत सांगितलं होतं की, ही घटना खरी आहे. मुख्यालयाच्या अधिकाऱ्याने घटनेत थोडा बदल केला होता. ते म्हणाले होते की, “डीआयजीने ते पाणी पिलं तर त्याचं तोंड भाजलं याचाच राग आल्याने डीआयजीने रागात अमोलला बोलावलं आणि पाणी चेक करण्यासाठी त्याला पाणी प्यायला सांगितलं. ते पाणी पिताना त्याच्या अंगावर सांडलं. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.” असेही ते म्हणाले होते.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/