CSMT पूल दुर्घटना प्रकरणात निवृत्त सब इंजिनिअर गजाआड

मुंबई : वृत्तसंस्था – मुंबईतीली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे १४ मार्च रोजी झालेल्या हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणात निवृत्त सब इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले होते. या प्रकरणात आत्तापर्य़ंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या चार झाली आहे. शितला प्रसाद कोरी असे अटक करण्यात आलेल्या सब इंजिनिअरचे नाव आहे.

शितला कोरी हे दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या कार्यकाळात पुलाची पाहणी केली गेली होती. पाहणी अहवालावर शितला कोरी यांची सही आहे. त्यामुळे कामात कसूर झाल्याने जबाबदार ठरवत त्यांना अटक करण्यात आली आहे. १४ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गर्दीच्या वेळेत ही दुर्घटना घडली होती.

यापूर्वी महापालिकेने दोन मुख्य अभियंता ए. आर. पाटील आणि सहाय्यक एस. एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दुर्घटनाग्रस्त पुल १९८१ साली बांधण्यात आला होता. यानंतर या पुलाची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेकडे होती.

सुशोभीकरणामुळे पुल पडला हिमालय पुल स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सुशोभिकरणामुळे कोसळल्याचा संशय पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. सुशोभीकरणावेळी पुलावर आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या. या लाद्यांचा भार वाढल्याने पुल कोसळला असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.