Pimpri News : डेटिंग App बनलेय गुन्हेगारांचा नवा अड्डा, 16 तरुणांना फसवणाऱ्या ‘सायली’कडे सापडले 15 लाखापेक्षा जास्त गिफ्ट्स

पिंपरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कमी वेळात आणि कोणतेही कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्यासाठी गुन्हेगार कोणकोणत्या युक्त्या वापरतील याचा नेम नाही. सध्या सोशल मीडियावरील डेटिंग अ‍ॅप गुन्हेगारांचा नवा अड्डा बनले आहे. अशाच एका अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लुटणारी 27 वर्षीय तरुणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ती ज्या पद्धतीने तरुणांना जाळ्यात ओढत होती, त्याच पद्धतीचा वापर करुन पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या आहेत. तपासात तिने जवळपास 16 तरुणांना आपल्या जळ्यात ओढून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सोशल मीडियावर एखाद्या मुलीने फ्रेंन्ड रिक्वेस्ट पाठवली की त्याची शहानिशा न करता तरुण ती फ्रेंन्ड रिक्वेस्ट स्विकारतात. फसवणुकीच्या उद्देशाने तरुणी मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करुन लाखोंचा ऐवज लुटून नेतात. असा प्रकार मागील काही दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात घडला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सायली काळे या तरुणीला अटक केली आहे. सायलीने तरुणांना लुबाडण्यासाठी डेटिंग अ‍ॅपचा वापर केला. डेटिंग अ‍ॅपद्वारे तिने 16 मुलांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने लंपास केले. हा प्रकार एका तरुणाच्या बाबतीत घडल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

डेटिंग अ‍ॅपवरुन फसवणूक झाल्यानंतर तरुणाने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवली. मात्र, ही तरुणी अत्यंत चलाख होती. ज्या डेटिंग अ‍ॅपवरुन ती तरुणांशी मंत्री करण्यासाठी ती स्वत:च अकाउंट उघडायचे ते अकाउंट नंतर ती डिलीट करायची. यामुळे पोलिसांना तिच्यापर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या. मात्र, या तपासाला एक आव्हान समजून पोलिसांनी तिच्या प्रमाणेच एक स्मार्ट गेम खेळला आणि ही तरुणी पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकली.

पोलिसांनी अटक केलेली सायली काळे ही पुणे शहरातील अतिशय उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या साधुवासवाणी रोडवरील एका सोसायटीत राहते. ज्यावेळी पोलिसांनी तिला अटक केली तेव्हा तिच्याकडे केलेल्या चौकशीतून समोर आलेली माहिती ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले.तिने एक नव्हे तर तब्बल 16 जणांना आपल्या जाळ्यात ओढून लुटले त्या सार्वांचे दागिने तिच्याकडे सापडेल. त्यामध्ये सोन्याच्या चेन, अंगठ्या आणि महागडे मोबाईल असा एकूण 15 लाखापेक्षा अधिक रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी तिच्याकडून जप्त केला.

सायली काळे हिने फसवणूक केलेल्या पैकी 4 जणांनी पोलिसांत तक्रार केली आहे.इतर तरुण आपली बेअब्रू होईल या भीतीने अजून ही तक्रार द्यायला धजावत नाहीत आणि नेमकी हीच अवस्था अशा गुन्ह्यात फसलेल्या अनेकांची होते. त्यामुळे या गुन्ह्याची नेमकी व्याप्ती किती मोठी आहे हे समजू शकत नाही. अशा प्रकरणांमध्ये ज्या तरुणांची फसवणूक झाली आहे, अशा तरुणांनी न घाबरता समोर येऊन पोलिसांत तक्रार केली पाहिजे.