बंदोबस्तासाठी जाताना पोलिसाचा अपघाती मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आडगाव शिवारातील विंचूर दळवी येथे दुचाकीवरून जात असताना दुचाकी गतिरोधकावरून आदळून झालेल्या अपघातात पोलीस हवालदार गंभीर जखमी झाले होते. जखमी पोलीस हवालदारावर उपचार सुरू असताना मंगळवारी मध्य रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्ञानेश्वर पांडुरंग भालेराव (वय-५५) असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ज्ञानेश्वर भालेराव हे आडगाव पोलीस ठाण्यात मागील तीन वर्षापासून पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गेल्या सोमवारी (दि.२९) भालेराव यांना निवडणुकीच्या विंचूर दळवी येथे बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. सकाळी सहा वाजता ते बंदोबस्तासाठी जात होते.

नवजीवन पब्लिक स्कूलजवळ दुचाकी गतिरोधकावरून आदळली त्यात भालेराव यांच्या डोक्यात असलेले हेल्मेट फुटून डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचार सुरू असताना मंगळवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.