दुर्देवी ! सुनेच्या मृत्यूनंतर सासूनंही सोडले प्राण, एकाचवेळी निघाल्या 2 अंत्ययात्रा

भुसावळ : पोलीसनामा ऑनलाईन – सासू सुनांमधील वाद सर्वच ठिकाणी पहायला मिळतो. परंतु त्यांच्यातील प्रेम क्वचितच पहायला मिळतं. साकेगावातील सासू सुनेचं प्रेम तर मृत्यूनंतरही कायम राहिलं आहे. सुनेच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्यानं सासुचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळं दोघींवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सासू सुनांमधील ही माया व वात्सल्य साकेगाव परिसरात चर्चेचा विषय ठरली.

साकेगावातील रहिवासी रंजनाबाई सुरेश मनोरे (वय 48) यांना पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शस्त्रक्रियेदरम्यान रंजनाबाई यांचा मृत्यू झाला. रविवारीच त्यांच्या मृत्यूची माहिती साकेगावात कळाली. रंजनाबाईंच्या सासूबाई मिराबाई गोविंदा मनोरे (वय 65) यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली.

सुनेच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं सोमवारी 11 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजता मिराबाई यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. पुण्यातून सून रंजनाबाई यांचं पार्थिव गावात आणलं गेलं. त्यानंतर सकाळी 11 वाजताच्या सुमारास सासू सुनेच्या मृतदेहावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सासू मिराबाई यांच्या पश्चात 3 मुलं, मुलगी, सुना-नातवंडे असा परिवार आहे. रंजनाबाई यांच्या पश्चात दोन मुलं आहेत.