पुण्यात वरिष्ठांची दिशाभूल, निष्काळजी केल्याप्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षकासह दोघे तडकाफडकी निलंबित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जखमी आयसीयुमध्ये असताना किरकोळ जखमी आहे, असे सांगून वरिष्ठांची दिशाभूल करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यास विलंब लावल्याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक फौजदार यांना निलंबित केले आहे.
महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली कथले आणि सहायक पोलीस फौजदार शामराव पाठक (वारजे माळवाडी पोलीस ठाणे) अशी त्यांची नावे आहे.

याबाबतची माहिती अशी, सोनाली कथले आणि शामराव पाठक हे वारजे माळवाडी पोलीस चौकीत नेमणुकीला असताना १६ नाव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता त्यांना खबर मिळाली. यल्लप्पा बसप्पा तळकेरे यास मारहाण झाल्याने माई मंगेशकर हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कथले व पाठक यांनी हॉस्पिटलला भेट दिली. मात्र, जखमी हा आयसीयुमध्ये दाखल होता.

तो बोलण्याच्या परिस्थितीत नाही असे तेथील डॉक्टरांनी सांगून तसे प्रमाणपत्रही पोलिसांना दिले. जखमीला दाखल करणाऱ्या रफिक शेख व प्रकाश कुचबाळ यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांना कोणीतरी चाकूने मारहाण करुन जखमी केले होते. ही वस्तूस्थिती होती. असे असताना कथले यांनी वारजे चौकीत येऊन सहायक पोलीस निरीक्षक शेवते यांना जखमी इसम किरकोळ जखमी आहे, असे खोटे सांगून त्या चौकीतून घरी निघून गेल्या.

तसेच याबाबतची कल्पना प्रभारी अधिकारी अमृत मराठे यांना दिली नाही. त्यानंतर जखमी याचा १७ नोव्हेंबरला मृत्यु झाला. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता विलंबाने गुन्हा दाखल झाला. त्याची दखल घेऊन कर्तव्यावरील हलगर्जीपणा, निष्काळजीपणा व बेजबाबदारपणाचा ठपका ठेवून सोनाली कथले व शेखर पाठक यांना निलंबित करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/