‘या’ नाराज भाजप खासदाराने धरला काँग्रेसचा ‘हात’

उमेदवारी न मिळाल्याने सोडली भाजप

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे खासदार उदित राज यांनी भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत उदित राज यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याआधी अगोदर उदित राज यांनी राहुल गांधी यांची आज सकाळी भेट घेतली होती. यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उदित राज यांनी भाजपवर हल्लाबोल करत आरोपही केले. भाजपा ही एक दलित विरोधी पार्टी असून भाजप मागासवर्गीय विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आपण २०१४ मध्येच काँग्रेस पक्षात जाण्याचा विचार करत होतो. मागील लोकसभा निवडणूकीत भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले उदित राज यांना यावेळी भाजपने उमेदवारी नाकारली. त्यामुळे नाराज झालेल्या उदित राज यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. भाजपने यावेळी उदित राज यांना उमेदवारी न देता या ठिकाणी हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपवर आरोप करताना उदित राज म्हणाले, भाजपनेच मला पक्ष सोडण्यास भाग पाडले. २०१८ मध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात दलित समाजाने बंदची हाक दिली होती. यावेळी मी देखील या बदलांना विरोध केला होता. त्यामुळेच पक्षातील वरिष्ठ नेते माझ्यावर नाराज झाले असावेत. मी मुद्दे उपस्थित करायला नको का ? मी यापुढेही दलित समाजाच्या हितासाठी आवाज उठवतच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.