ज्वेलर्स बांधवांची गळफास लावून आत्महत्या, आर्थिक मंदी बनले कारण

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   राजधानी दिल्लीचे हृदय असणाऱ्या चांदनी चौक परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या दोन भावांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आर्थिक मंदी आत्महत्येचे कारण सांगितले जात आहे. या घटनेनंतर त्यांच्या घरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या चांदणी चौकातील माळीवाड्यात हळदीरामच्या वर कृष्णा ज्वेलर्सच्या नावाने आदिश्वर गुप्ताचे दुकान आहे. त्याचे दोन मुलगे अंकित गुप्ता (47) आणि अर्पित गुप्ता (42) त्याच दुकानातून व्यापार करत होते. बुधवारी दोन्ही भाऊ दुकानात होते. पहाटे तीनच्या सुमारास दोन्ही भावांनी त्यांच्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच बाजारपेठेत खळबळ उडाली. पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही भावांचे मृतदेह खाली घेतले. पंचनामा कारवाईनंतर दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. दोन्ही भाऊ जुने दिल्लीतील बाजारपेठ सीतारामचे रहिवासी होते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन्ही भावांचा व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोघेही कर्जात होते. या गोष्टीला कंटाळून या दोघांनीही हे भयानक पाऊल उचलले. त्या दोघांनी दुकानाच्या पंख्याला लटकवून फास लावून घेतला. या घटनेने त्याचे परिचित आणि कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.