दिल्ली निवडणूक : भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, केजरीवालांचा ‘सामना’ करणार सुनील यादव

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दहा उमेदवारांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली आहे विशेष म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात भाजपने सुनील यादव यांना तिकीट दिले आहे.

भाजपाने आपली दुसरी यादी जाहीर करत नांगलोई जाट येथून सुमनलता शौकीन, राजौरी गार्डन मध्ये रमेश खन्ना, हरी नगर मधून तेजिंदर पाल बग्गा, दिल्ली कॅंट मधून मनीष सिंह, नवी दिल्ली मधून सुनील यादव, कस्तुरबा नगरचे रविंद्र चौधरी, महरौली येथील कुसुम खत्री, कालकाजी येथील धरमवीर सिंग, कृष्णा नगरचे अनिल गोयल आणि शाहदरा येथील संजय गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवालही यावेळी नवी दिल्लीच्या जागेवरुन निवडणूक लढवत आहेत. पहिल्या यादीमध्ये भाजपला नवी दिल्ली मतदारसंघातील उमेदवार निश्चित करता आला नव्हता. परंतु आता भाजपने नवी दिल्ली जागेवर केजरीवाल यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केले आहे. सुनील यादव यांना केजरीवालांच्या विरोधात तिकीट मिळाले आहे. सुनील यादव हे दिल्ली भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत.

आम आदमी पक्षाने आतापर्यंत 70 जागांवर आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे तर भाजपने आपल्या पहिल्या यादीत 57 उमेदवारांची घोषणा केली होती आणि आता आणखी दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. तर काँग्रेसकडून देखील 54 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर पुन्हा सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

केव्हा असेल मतदान ?
दिल्ली विधानसभेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी आहे. 22 जानेवारी रोजी नावाची छाननी आणि अर्जाची तपासणी केली जाईल. 24 जानेवारी हा उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस असेल. 8 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडेल तर 11 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा –