‘सत्यमेव जयते’ मध्ये झळकलेल्या लव्ह कमांडोचे पितळ उघडे, पोलिसांकडून अटक 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अभिनेता आमिर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात झळकलेल्या ‘लव्ह कमांडो’ च्या संस्थाचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेम विवाह करणारी जोडपी आणि घरातल्यांचा विरोध झुगारून विवाह करण्यास इच्छुक असलेल्या जोडप्यांना आश्रय देण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या संजोय सचदेव याचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. आश्रय देण्याच्या नावावर तो जोडप्यांचा छळ करायचा. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमीरच्या ‘सत्यमेव जयते’वर देखील पुन्हा टीका होऊ लागली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संजोय सचदेव लव्ह कमांडो नावाची स्वयंसेवी संस्था चालवतो. ही संस्था घरातल्यांचा विरोध झुगारून प्रेम विवाह केलेल्या आणि करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना तात्पुरता आधार देण्याचे काम करते. यामुळे देशभरात या संस्थेचे नाव आहे. अनेक युगलं या संस्थेच्या आश्रयास येतात. यामुळे संजोयचे नाव प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आमीर खानने त्याला ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमात निमंत्रित केले होते. यामुळे संजोयचे नाव घराघरात पोहोचले.

पण संजोयच्या आश्रमात शरण घेतलेल्या जोडप्यांपैकी एका तरुणीने तिथून पळ काढत पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर संजोयचा खरा चेहरा जगासमोर आला. नंतर पोलिसांनी लव्ह कमांडो आश्रमावर धाड टाकली. त्यावेळी तिथे त्यांना तहानभूकेने व्याकुळ झालेली चार जोडपी  आढळली. संजोय व त्याच्या साथीदारांनी महिला आयोगाने पाठवलेल्या या जोडप्यांना आश्रमात राहण्यास जागा दिली. पण त्यानंतर या जोडप्यांना रोज मारहाण करण्यात येत होती. त्यांच्याजवळील पैसे व दागिनेही संजोयने लुटले होते. जोडप्याला संजोय बळजबरीने दारू पाजत असल्याचे समोर आले. त्यानंतर या ढोंगी लव्ह कमांडोला अटक करण्यात आली.