Delhi Violence LIVE : दिल्लीत हिंसाचार थांबला, समोर येऊ लागली विनाशाची दृश्ये, आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू तर 150 जखमी

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – देशाची राजधानी दिल्लीत उसळलेला हिंसाचार आता शांत झाला आहे. बुधवारी दिल्लीत हिंसाचाराची कोणतीही घटना घडली नाही, परंतु शहरात अजूनही तणावपूर्ण शांतता आहे. प्रत्येकाला आशा वाटतेय की दिल्लीतील शांतता परत येईल. आता दिल्लीतील हिंसाचारातील मृत्यूंचा आकडा वाढला आहे. गुरूवारी सकाळपर्यंत 32 लोकांनी जीव गमावला आहे. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मोदी सरकार आणि राज्य सरकारने योग्य कृती करण्यास सुरू केली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानंतर दिल्लीतील रस्त्यावर उतरलेल्या लोकांशी चर्चा केली आणि त्यांना विश्वास दिला.

दिल्ली हिंसाचाराचे लाइव्ह अपडेट :

10.30 AM : दिल्ली हिंसाचार आणि त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली झाल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनंतर आता पक्ष प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेस नेत्याने आरोप केला की, असे वाटत आहे की देशात न्याय करणार्‍यांना सोडले जाणार नाही.

रणदीप सुरजेवाला म्हणाले, विषारी आणि प्रक्षोभक भाषणे देणार्‍या भाजपा नेत्यांच्या विरोधात सुनावणी करणारे दिल्ली हायकोर्टचे वरिष्ठ जज एस. मुरलीधर यांची रातोरात बदली करण्यात आली आहे. काँग्रेस नेत्यांनी या घटनेची तुलना हिट अँड रन केसशी केली आहे.

10.18 AM : दिल्ली हिसाचारात मृत्युमुखी पडणार्‍यांचा आकडा वाढत चालला आहे. गुरुवारी सकाळी गुरु तेग बहादुर हॉस्पिटलकडून नवा आकडा जारी करण्यात आला आहे. हॉस्पिटलनुसार, आतापर्यंत दिल्ली हिंसाचारात 35 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गुरु तेग बहादुर हॉस्पिटल : 28

LNJP हॉस्पिटल : 2

JPC हॉस्पिटल : 1

09.52 AM : हायकोर्टच्या जजची बदली झाल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राहुल यांनी ट्विटमध्ये जस्टिस लोया यांचा उल्लेख करून लिहिले आहे की, धाडसी जज लोया यांना नमन, ज्यांची बदली करण्यात आली नव्हती.

09.20 AM : दिल्ली हायकोर्टच्या जजची बदली केल्याने प्रियंका गांधी यांनी देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी ट्विट केले की, अर्ध्यारात्री जस्टिस मुरलीधर यांची झालेली बदली धक्कादायक आहे. सरकारला न्यायाचे तोंड बंद करायचे आहे.

09.00 AM : दिल्ली फायर डिपार्टमेंटने सांगितले की, रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत हिंसाचार झालेल्या ठिकाणांहून 19 फोन आले. या दरम्यान 100 पेक्षा जास्त फायरमॅनला मदतीसाठी पाठवण्यात आले.

08.50 AM : दिल्लीच्या मौजपुर परिसरात जेथे सर्वात आधी हिंसाचार भडकला होता, तेथे आता शांतता आहे. येथे वाहनांची ये-जा सुरू झाली आहे. परंतु, अजूनसुद्धा मोठ्याप्रमाणात सुरक्षा दलांना तैनात करण्यात आले आहे. दिल्ली हिंसाचारात जखमी झालेल्यांची संख्या 150पेक्षा जास्त झाली आहे.

न्यायालयाने फटकारल्यानंतर अ‍ॅक्शनमध्ये दिल्ली पोलीस!

दिल्ली हिंसाचारावर बुधवारी हायकार्टात सुनावणी झाली, या सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिल्ली पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले. कोर्टाने फटकारल्यानंतर दिल्ली पोलीस अ‍ॅक्शनमध्ये आले आहेत. आतापर्यंत 18 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. तर 106 लोकांना अटक करण्यात आली आहे. हायकोर्टाने या दरम्यान भाजपा नेते कपिल मिश्रा, अनुराग ठाकुर, प्रवेश वर्मा यांच्या वक्तव्यावर सुनावणी केली.

दिल्लीमध्ये शाळा बंद, परीक्षा झाल्या नाहीत

हिंसाचार उसळल्याने दिल्ली सरकारने सध्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर पूर्व परिसरातील शाळा बंद राहतील, तर सीएससीची गुरूवारी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

दिल्लीतील गल्लीबोळातही कडेकोट बंदोबस्त

हिंसाचाराच्या तीन दिवसानंतर केंद्रीय गृह मंत्रालय अ‍ॅक्टिव्ह झाले आणि आता दिल्लीतील सर्व रस्त्यांवर अर्धसैनिक दलांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीत आता 45 अर्धसैनिक दलाच्या कंपन्या तैनात आहेत. दिल्लीच्या चांदबाग, गोकुलपुरी, मौजपुर, जाफराबाद परिसराला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे.

अमित शहांवर काँग्रेसचा हल्लाबोल

दिल्लीतील हिंसाचारावरून काँग्रेस पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला केला आहे. बुधवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी मीडियासमोर आल्या आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना त्यांनी हिंसाचाराला जबाबदार ठरवले. आज काँग्रेसचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढणार आहे, तसेच राष्ट्रपतींना भेटणार आहे.

काँग्रेसने केलेल्या हल्ल्याला भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी भाजपाकडून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसला उत्तर दिले आणि 1984 च्या दंगलीची आठवण करून दिली. भाजपाने आरोप केला की, ही वेळ शांततेचा संदेश देण्याची आहे, परंतु काँग्रेस पक्ष राजकारण करत आहे.