पुण्यातील प्रसिध्द सराफी व्यावसायिकाला 50 कोटीच्या खंडणीची मागणी, सर्वत्र खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील प्रसिद्ध सराफी व्यावसायिकाला त्यांच्याकडेच काम करणार्‍या तीन कामगारांनी पिस्तूलाचा धाक दाखवून 50 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे. आशिष हरिचंद्र पवार (वय 27, रा. लक्ष्मीनगर, सहकारनगर), रुपेश ज्ञानोबा चौधरी (वय 45, रा. तुळशीबाग वाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय 32, रा. प्रेमनगर, मार्केटयार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत 42 वर्षीय प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष पवार व चौधरी हे सराफ व्यावसायिकाकडे बॉडीगार्ड म्हणून काम करत होते. तर, रमेश पवार हा सराफ व्यावसियाकाच्या घरात काम करतो. सराफ व्यावसायिकाचे पूर्वीचे बॉडीगार्ड असलेले आरोपींनी घरकाम करणार्‍या रमेश पवार याच्या मदतीने एक क्लिप तयार केली. ती क्लिप फिर्यादींना दाखविली. त्यासाठी त्यांना घराजवळील एका कॅफे कॉफीडे मध्ये बोलविले. तेथे क्लिप दाखविल्यानंतर त्यांना क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली.

तसेच, 50 कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली. या प्रकरणाची पोलिसांना माहिती दिल्यास स्वतः जवळील पिस्तूल दाखवून गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर फिर्यादींनी सोमवारी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चनसिंग यांच्याकडे धाव घेऊन तक्रार केली. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांना गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून तिघांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. आरोपींनी नेमकी कशामुळे खंडणी मागितली याचा तपास केला जात आहे, असे उपायुक्त बच्चन सिंह यांनी सांगितले.