सांगली महापालिकेत ईव्हीएम घोटाळा, पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन

सांगली, मिरज आणि कुपवाड  महापालिकेच्या निवडणूकीत ईव्हीएम घोटाळा झाला आहे. त्यामुळे  ही निवडणूक मतपत्रिकेवर पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी अपक्ष विकास आघाडीच्या उमेदवारांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम- पाटील यांच्याकडे केली आहे. या  मागणीकडे दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी महेश खराडे, अमर पडळकर, सीमा जाधव, मारुती नवलाई, बाहुबली कबाडगे, अशोक माने, डॉ. सचिन मालेदार आदी उपस्थित होते.
[amazon_link asins=’B07CKPLGDT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’508a016c-9a51-11e8-b16f-b398adc22170′]

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे,  मतदानप्रक्रियेत व्हीव्हीपॉट मशीन वापरण्यात आलेले नाही. निवडणूकांचे लागलेले निकाल संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यामुळे मतपत्रिकेवर पुन्हा निवडणूक घेण्यात यावी. महापालिकेत भाजपाची सत्ता आलेली आहे. मात्र मतदानप्रक्रियेबाबत संशयास्पद  वातावरण आहे. मतदान मशीन सील करताना आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. निवडणूकीपूर्वी जी मतदानयंत्रे उमेदवारांना दाखविण्यात आली तीच यंत्रे निवडणूकीसाठी वापरली का, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे. अनेक प्रभागातील लोकांना माहित नसलेले उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यांना जादा मते कशी पडली हा संशोधनाचा विषय आहे. मतांची हेराफेरी करण्यात आली आहे का असा संशय निर्माण झाला आहे.

ईव्हीएम मशीन वापरायचे असेल तर व्हीव्हीपॉट मशिन वापरणे गरजेचे होते किंवा ती मतपत्रिकेवर घेणे आवश्यक होते. या निवडणूका रद्द करुन फेरनिवडणूक घेण्यात यावी. मतदान  प्रक्रिया पारदर्शीपणे होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पाटील यांनी यावेळी महापालिकेची आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. आणि उमेदवारांच्या मागण्याबाबत चर्चा केली.