शिवेंद्रराजेंसोबतच्या भेटीवर अजित पवारांचा खुलासा, म्हणाले – ‘अशा भेटी होत राहतात, त्यात काहीही काळंबेरं नाही’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. यावर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. साताऱ्यातील भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले विकास कामासाठी आले होते. त्यात काहीही काळंबेरं नाही असं अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार म्हणतात, “शिवेंद्रराजे हे विकास कामासाठी भेटून गेले. या अशा भेटी होत राहतात. त्यामुळं असा काही अर्थ काढू नका. त्यात काहीही काळंबेरं नाही.” दरम्यान ही भेट वैयक्तिक कारणासाठी असल्याचं शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.

आज अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. ते आज विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांची भेट घेणार आहेत. तर दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोनाच्या स्थितीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अजित पवार सायंकाळी होणाऱ्या माझं कुटुंब माझी जबाबदारी या या कार्यक्रमातीही उपस्थित राहणार आहेत. पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून एकूण 8 रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.