शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन (Memorial Day). त्यानिमित्त त्यांना राज्यभरातून आदरांजली वाहिली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (deputy-cm-ajit-pawar) यांनीही त्यांना आदरांजली वाहिली असून, बाळासाहेबांचे स्वप्न साकार करण्याचा निर्धार करू असे म्हटले आहे.

‘महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. स्वर्गीय बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केले आहे. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचे स्वप्न होते. स्वर्गीय बाळासाहेबांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करूया, असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

शिवाजी पार्कवर शिवसैनिकांची सकाळपासून रीघ
बाळासाहेब हे तमाम शिवसैनिकांचे दैवत होते. आपल्या दैवताला आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावर शिवसैनिक गर्दी करतात. आजदेखील सकाळपासूनच शिवसैनिकांची रीघ लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या रूपाने राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाल्याने शिवसैनिकांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, काेरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वत: तसे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत.